भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा वादात सापडल्या आहेत. यासंदर्भात, मोइत्रा यांनी अमित शाह यांचे 'शीर कापण्या'संदर्भात भाष्य केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण जोर धरत असतानाच, आता हे प्रकरणही समोर आले आहे.
यासंदर्भात बंगाल भाजपने म्हटले आहे की, "जेव्हा महुआ मोइत्रा गृहमंत्र्यांचे शीर कापण्यासंदर्भात भारष्य करतात, तेव्हा ते टीएमसीची हताशा आणि हिंसेची संस्कृती दर्शवते. ज्यामुळे बंगालची छबी खराब होत आहे आणि राज्याला मागे नेत आहे." पक्षाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यात मोइत्रा पत्रकारांसोबत बोलताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदींसंदर्भात भाष्य करणाऱ्याला अटक - बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या युकवकाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव मोहम्मद रिजवी उर्फ रजा असे आहे. तो दरभंगामध्येच राहतो. त्याने विरोधकांच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींसंदर्भात अपशब्द वापरले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
खरेतर, बिहार निवडणुकीच्या तोंडावरच विरोधी पक्ष मतदार हक्क यात्रेचे आयोजित करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. बुधवारी (२७ ऑगस्ट) दरभंगा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले होते. मात्र, यावेळी राहुल अथवा तेजस्वी व्यासपीठावर उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे.