१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:33 IST2025-08-06T06:32:54+5:302025-08-06T06:33:47+5:30
लष्कराने पोस्टला ‘धिस डे दॅट इयर - बिल्ड अप ऑफ वॉर : ५ ऑगस्ट १९७१ असे कॅप्शन दिले. नोफॅक्ट्स हा हॅशटॅग वापरला आहे. १९५४ पासून पाकला २ अब्ज डॉलरच्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे या बातमीचे शीर्षक आहे.

१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
नवी दिल्ली : भारतरशियाकडून तेल खरेदी करून ते अन्य देशांना विकून नफेखोरी करत असल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केल्यानंतर भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने मंगळवारी एका वृत्तपत्रातील ५ ऑगस्ट १९७१ या दिवशी प्रसिद्ध झालेली बातमी एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केली. त्यात १९५४पासून अमेरिका पाकिस्तानला करत असलेल्या लष्करी मदतीचा सविस्तर उल्लेख आहे.
लष्कराने पोस्टला ‘धिस डे दॅट इयर - बिल्ड अप ऑफ वॉर : ५ ऑगस्ट १९७१ असे कॅप्शन दिले. नोफॅक्ट्स हा हॅशटॅग वापरला आहे. १९५४ पासून पाकला २ अब्ज डॉलरच्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे या बातमीचे शीर्षक आहे.
बांगलादेश मुक्तीसाठी भारताने पाकिस्तान विरोधात लढाई लढली. त्याआधी संरक्षण उत्पादन मंत्री व्ही. सी. शुक्ला यांनी पाकिस्तानला अमेरिकेने दिलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल राज्यसभेतील चर्चेत माहिती दिली होती. रशियाकडून भारत तेल का विकत घेतो असा सवाल करणाऱ्या ट्रम्प यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने दिलेला १९७१च्या बातमीचा दाखला अमेरिकेच्या दुटप्पीपणावर प्रकाश टाकतो.
...मग तुम्ही आणि युरोपीय संघ रशियासोबतचे व्यापारी संबंध का तोडत नाही? भारताचा रोकडा सवाल -
एक दिवस आधीही, सोमवारी, ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफमध्ये मोठी वाढ करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळीही त्यांनी रशियाकडून भारताची तेल खरेदी हेच कारण दिले होते. ट्रम्प यांच्या या धमकीला भारतानेही सडेतोड उत्तर देत अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेचा आवर्जून उल्लेख केला होता.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी रात्री पत्रक प्रसिद्धीस देताना म्हटले होते की, आम्हाला रशियासोबतचा व्यापार संपवायला सांगत असताना अमेरिका आणि युरोपीय संघ रशियासोबतचे व्यापारी संबंध कायम ठेवून आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे. युरोप-रशिया व्यापारात फक्त ऊर्जाच नव्हे, तर खते, खाण उत्पादने, रसायने, लोह व स्टील आणि यंत्रसामग्री व वाहतूक उपकरणे यांचाही समावेश आहे. अमेरिका रशियाकडून आण्विक उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलाडियम, खते व रसायने आयात करतो.