अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 10:41 AM2023-07-09T10:41:20+5:302023-07-09T10:41:59+5:30

मार्ग पावसामुळे खचला : पूल गेले वाहून, पावसाचा जोर कायम, शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते

Amarnath Yatra postponed for second consecutive day, 50 thousand devotees stranded | अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

googlenewsNext

शिवराज बिचेवार

थेट अमरनाथ यात्रेतून :  पाऊस, बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली. अमरनाथ गुफेकडून बालटालकडे येणारा परतीचा मार्ग पावसामुळे पूर्णपणे खचला आहे. ठिकठिकाणी या मार्गावरील पूलही वाहून गेले आहेत. विविध तळांवर सुमारे ५० हजार भाविक अडकले आहेत. त्यापैकी चार हजारांवर भाविक पंचतर्णी येथे अडकले आहेत. याठिकाणी आयटीबीपीने उभारलेल्या तंबूतही पाणी शिरले आहे, तर वीजपुरवठा बंद असल्याने कुटुंबीयांचा या भाविकांशी संपर्क होत नाही. 

शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते. त्यातील जवळपास एक हजार भाविक सुखरूप बालटाल येथे पोहोचले, तर चार ते पाच हजार भाविक हे पंचतर्णी येथेच अडकले आहेत. पावसामुळे यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने पंचतर्णी येथे भाविक तंबूत शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात कुडकुडत दिवस काढत आहेत.  तंबूमध्ये थांबण्यासाठी एका भाविकाकडून ६५० रुपये घेण्यात येत होते. परंतु, आता बालटालकडे परत येण्यासाठी मार्गच नसल्यामुळे तंबू व्यावसायिकांनी प्रत्येकी एक हजार रुपये उकळले. हजारो भाविक श्रीनगरध्येच थांबले असून, तेथील हॉटेल व्यावसायिकांनीही आपले दर वाढविले आहेत. 

उपर देख के भागना है 
अमरनाथ दर्शनानंतर भर पावसात भाविक बालटालच्या दिशेने येत असताना दरड कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भाविकांना परत गुफेकडे जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांनी अशा परिस्थितीतच बालटाल गाठण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी आयटीबीपी आणि एनडीआरएसच्या जवानांनी या भाविकांची मदत केली. खाली उतरताना हे जवान रुकना नही, उपर देखके भागना है... अशा सूचना देत होते. 

रामबनजवळ रस्ता गेला वाहून
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे  जम्मू ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वरील  रामबन येथील रस्ता वाहून गेला. त्यामुळे जम्मूवरून अमरनाथकडे येणाऱ्या भाविकांना त्याच ठिकाणी थांबविण्यात आले होते. 

लंगरवर आला ताण, उरला फक्त वरण-भात
बालटाल बेस कॅम्प परिसरात दरवर्षी अनेक राज्यांचे जेवणाचे लंगर लागतात. प्रत्येक लंगरमध्ये जेवणाचे ३० ते ३५ पदार्थ, मिठाई, ज्युस, सुकामेवा, फळे भाविकांना दिली जातात. परंतु, गेल्या दोन दिवसांत यात्रा बंद असल्यामुळे बालटाल येथे मुक्कामी थांबलेल्या भाविकांची संख्या अचानक वाढली आहे. त्याचा ताण या ठिकाणी चालणाऱ्या लंगरवर आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी भाविकांना डाळ-भात खाऊनच पोट भरावे लागले.

हवामान सुधारण्याची प्रतीक्षा
अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित झाल्यामुळे जवळपास ५० हजार भाविक विविध तळांवर अडकले आहेत. बालटाल येथेच जवळपास १९ हजार भाविक अडकले आहेत. हवामान सुधारण्याची भाविकांना प्रतीक्षा आहे. 

आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू
अमरनाथ यात्रेदरम्यान यावर्षी आतापर्यंत ९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू गेल्या दाेन दिवसांमध्ये झाला आहे.

Web Title: Amarnath Yatra postponed for second consecutive day, 50 thousand devotees stranded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.