विमान प्रवास महागणार; सुस्साट अन् पॉवरबाज 'बोइंग ७३७ मॅक्स'वरील बंदीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:10 IST2019-03-13T13:07:29+5:302019-03-13T13:10:33+5:30
भारतानं इथोपियन विमान दुर्घटनेनंतर रात्रभरात बोइंग 737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली आहे.

विमान प्रवास महागणार; सुस्साट अन् पॉवरबाज 'बोइंग ७३७ मॅक्स'वरील बंदीचा फटका
नवी दिल्ली- भारतानं इथोपियन विमान दुर्घटनेनंतर रात्रभरात बोइंग 737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बोइंग विमानांच्या सर्व सेवा खंडित करण्यात येणार आहेत. भारतानं या विमानांवर बंदी आणल्यानं त्याचा सरळ सरळ स्पाइस जेट, जेट एअरवेजवर प्रभाव पडणार आहे. स्पाइस जेटकडे जवळपास 12, तर जेट एअरवेजकडे जवळपास 5 बोइंग विमानं आहेत. या बंदीचा परिणाम इतर विमानांच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पाइस जेटनं यासंदर्भात प्रवाशांना काही सूचनाही केल्या आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीय विमान कंपन्यांना वेळोवेळी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच आता बोइंगची विमानं बंद केल्यानं विमानांचे तिकीटदर भडकण्याची चिन्हे आहेत.
जेट एअरवेजची 54 विमानं नादुरुस्त
जेट एअरवेजच्या 119 विमानांपैकी 54 विमान आता कार्यरत नाहीत. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी अबूधाबीची विमान कंपनी असलेल्या एतिहादकडून या संकटांशी दोन हात करण्यासाठी 750 कोटींची मागणी केली आहे. एतिहादची जेट एअरवेजशी भागीदारी आहे.
इंडिगो आणि गो एअरही संकटात
इंडिगोमध्ये वैमानिकांची कमी आहे. त्यामुळेच कंपनीनं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच काही दिवस दररोज 30 उड्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे. गो एअरनंही त्यांच्या काही विमानांची सेवा खंडित केली आहे.
AIची 23 विमानं नादुरुस्त
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची जवळपास 23 विमानं तांत्रिक कारणास्तव उड्डाण भरण्यास सक्षम नाहीत. निधीच्या कमतरतेचा सामना करणारी एअर इंडिया या विमानांची इंजिन खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीला विश्वास आहे की, नवी इंजिन खरेदी केल्यास दिल्लीतील उडालेलं विमान थेट लॉस एन्जिलिसला जाईल.
केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू घेणार बैठक
केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभूही यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत. त्यांनाही विमानांच्या तिकिटांचे दर भडकण्याची भीती सतावते आहे.
बोइंगची मॅक्स विमानं का आहेत विशेष ?
बोइंगच्या 737 मॅक्स विमानांमध्ये नव्या डिझाइनच्या पंख्यांचा वापर केला गेला आहे. तसेच या विमानांना उड्डाणांसाठी कमी इंधन लागते. प्रवाशांना बसण्यासाठी ही विमानं सुटसुटीत आहेत. या विमानांमध्ये बसल्यावर जास्त धक्के जाणवत नाहीत. बोइंगची ही विमानं वैमानिकांनाही चांगली सुविधा देतात. बोइंगच्या विमानात नव्या डिस्प्लेच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच 15 इंचाची मोठी स्क्रीन बसवण्यात आली असून, त्यातून वैमानिकांना कमी मेहनतीत जास्त सूचना मिळतात. या विमानातील इंजिन पर्यावरणपूरक असून, विषारी गॅसचं कमी उत्सर्जन होतं. बोइंगच्या विमानांत सॉफ्टवेअर समस्येचा अभाव आहे. तसेच जगभरात मोजक्याच वैमानिकांना ही विमानं चालवता येतात.