भत्ता दुप्पट, ५० लाखांचा विमा, पेन्शनही हमखास; मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:46 IST2025-10-27T09:46:34+5:302025-10-27T09:46:34+5:30
छोट्या व्यावसायिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज

भत्ता दुप्पट, ५० लाखांचा विमा, पेन्शनही हमखास; मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे आश्वासन
एस. पी. सिन्हा
पाटणा : राजद नेते व महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी रविवारी ‘इंडिया’ महाआघाडी बिहारमध्ये सत्तेत आली तर पंचायतराज व्यवस्थेतील प्रतिनिधींचा भत्ता दुप्पट वाढवला जाईल, असे आश्वासन दिले. यासोबत ५० लाख रुपयांचे विमा कवच आणि पेन्शनचा लाभही दिला जाईल, असे यादव यांनी म्हटले आहे.
नितीशकुमार यांनी पंचायत राज संस्था अधिकाऱ्यांना, वॉर्ड सदस्यांच्या भत्त्यात तसेच इतर लाभांत वाढ केली होती. जि. प. अध्यक्षांचा भत्ता २० वरून ३० हजार रुपये आणि सरपंचांसाठी हा भत्ता ५ वरून ७,५०० रुपये करण्यात आला होता. राज्यात सध्या ८,०५३ ग्रामपंचायती, ५३३ पंचायत समित्या आणि ३८ जिल्हा परिषदा आहेत.
... आता भत्ते दुप्प्ट करू
नितीशकुमार सरकारने वाढवलेल्या भत्त्यांच्या तुलनेत आपली महाआघाडीची सत्ता आली तर हे भत्ते दुप्पट केले जातील, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
याशिवाय सार्वजनिक वितरण प्रणालीत वितरकांना प्रति क्विंटलमागे मिळणारी कमिशनची रक्कमही वाढवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. याशिवाय छोट्या व्यावसायिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल, असे आश्वासनही यादव यांनी दिले.
काँग्रेस पक्ष तेजस्वींच्या पाठीशी ठामपणे उभा : गहलोत
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी छठनंतर बिहार दौऱ्याला सुरुवात करतील आणि पूर्ण शक्तिनिशी प्रचार करतील, असे सांगून गहलोत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडे निवडणूक बाँडचे पैसे आहेत आणि ते त्या पैशाचा वापर प्रचारात करीत असल्याचे ते म्हणाले.