मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:50 IST2025-08-08T13:49:29+5:302025-08-08T13:50:21+5:30

या देशात संपूर्ण निवडणूक प्रणालीची चोरी करण्यात येत आहे असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

Allegations of vote rigging, question mark on Election Commission; Sharad Pawar's advice to Rahul Gandhi on presentation | मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतचोरीचा मोठा आरोप केला. भाजपा आणि निवडणूक आयोगाने हातमिळवणी करत मतांची चोरी केली असं त्यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन घेऊन याबाबतचे पुरावे लोकांसमोर मांडले. या पत्रकार परिषदेनंतर इंडिया आघाडीच्या बैठकीतही राहुल गांधी यांनी यावर पुराव्यासह प्रेझेंटेशन दिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांनी जे प्रेझेंटेशन सादर केले, ते देशभरात प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात दाखवले पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी दिला. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी सविस्तरपणे आम्हाला प्रेझेंटेशन दाखवले. त्यावर खूप चांगली चर्चा बैठकीत झाली. शरद पवारांनी प्रत्येक राज्यात हे प्रेझेंटेशन द्यायला हवे. जिल्ह्यात, तालुक्यात हे व्हावे असा सल्ला दिला. देशात जे कुणी सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवतात त्यांनाही हे प्रेझेंटेशन द्यावे. जे खरे आणि खोटे ते लोकांसमोर येईल. निवडणूक आयोग जर स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यायला हवे. ही सर्व माहिती आयोगाच्या वेबसाईटवरून घेतली आहे असं त्यांनी म्हटलं. 

काय म्हणाले राहुल गांधी?

देशाच्या कर्नाटक राज्यातील एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख खोटे मतदार आहेत हे आम्ही आता जनतेसमोर सबळ पुराव्यानिशी मांडले आहे. तरीही निवडणूक आयोग म्हणतो की स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. या देशात संपूर्ण निवडणूक प्रणालीची चोरी करण्यात येत आहे असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ढीगभर पुरावे स्क्रीनवर दाखविले. मतांची चोरी करण्याचे प्रकार काही राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशभरात होत आहेत. निवडणूक प्रणालीशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व मतदार याद्या या सदर गैरप्रकारांचा सबळ पुरावा असून तो नष्ट करण्याचा निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोग दोघे मिळून ही फसवणूक करत आहेत. याप्रकरणात न्याययंत्रणेचा हस्तक्षेप आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाने दिले २ पर्याय

दरम्यान, देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर हल्ला आहे. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही आता प्रत्युत्तर दिलं आहे. प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असे दोन पर्याय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिले आहेत. एक शपथपत्र पाठवून ते जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. जर ते चुकीचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. 

Web Title: Allegations of vote rigging, question mark on Election Commission; Sharad Pawar's advice to Rahul Gandhi on presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.