टेंडर वाटप, बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप; बेळगाव कँटोन्मेंट बोर्डवर सीबीआयचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:39 IST2025-12-10T13:38:09+5:302025-12-10T13:39:01+5:30
आरोपांमुळे बोर्डाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

संग्रहित छाया
बेळगाव : टेंडर वाटप आणि बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर दिल्लीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने मंगळवारी बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर अचानक छापा टाकला.
कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनात घडलेल्या गैरप्रकारांचा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. सीबीआयचे अधिकारी महत्त्वाची कागदपत्रे तपासत असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतले आहेत. कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेली विविध विकासकामे आणि कंत्राटे देण्यासाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार काही व्यक्तींनी दिल्लीतील सीबीआयकडे केली होती.
याच तक्रारींच्या आधारावर, दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने बेळगावमध्ये येऊन ही कारवाई केली आहे. सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि पदाचा गैरवापर अशा आरोपांमुळे बोर्डाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.