Avimukteshwaranand Saraswati : गेल्या काही दिवसांपासून मंदिर-मशिदीशी संबंधित वाद चर्चेत आहे. याशिवाय, मंदिर-मशीद वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्यही केंद्रस्थानी आले आहे. आता या सर्व वादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'धार्मिक इस्लाम मानणाऱ्या लोकांनाही सत्य बाहेर यावे, असे वाटते. जे विरोध करतात, ते राजकीय इस्लामवर विश्वास ठेवतात. कब्जा केलेल्या जमिनीवर अदा केलेली नमाज, अल्लादेखील कधी स्वीकारणार नाही,' असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणतात, 'खरा इस्लाम कोणता? मंदिरे पाडून मशिदी बांधल्या, तो राजकीय इस्लाम होता, धार्मिक इस्लाम नाही. धार्मिक इस्लाम हे कधीही करू शकत नाही. एखाद्याच्या जमिनीवर ताबा मिळवून नमाज अदा केली जात असेल, तर धार्मिक इस्लामनुसार अल्लाह कधीही ती नमाज स्वीकारत नाही. राजकीय इस्लामला मानणाऱ्यांना अडचणी येऊ शकते, मात्र धार्मिक इस्लाम मानणाऱ्यांनी त्याचे स्वागत केले पाहिजे.'
'मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचे ऐकल्यावर आपल्याला वेदना होतात. त्याचप्रमाणे मुस्लिम तरुणांनादेखील याचे दु:ख वाटते की, आपले पूर्वज असे अत्याचारी होते. त्यामुळेच सत्य बाहेर यावे, असे त्यालाही वाटते आणि आपल्यालाही तेच हवे असते. आम्ही काही मुस्लिमांशी बोललो, त्यांनीही सांगितले की, आम्हालाही स्पष्टता हवी आहे. धार्मिक इस्लाम मानणाऱ्या लोकांना काही अडचण नाही, पण राजकीय इस्लाम मानणाऱ्यांना सर्वाधिक त्रास होतोय,' असंही अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरनंद सरस्वती म्हणतात की, 'संघ प्रमुख त्यांच्या सोयीने बोलतात. जेव्हा त्यांना गरज होती, तेव्हा विरोधात बोलले, आता गरज नाही तर योयीने बोलत आहेत. मोहन भागवतांनी आम्हाला नेता व्हायचे आहे, असा चुकीचा अंदाज लावला. मंदिरे पाडली आणि मशिदी बांधल्या गेल्याचे आम्हाला दुःख आहे, त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. मोहन भागवत आमचे चुकीचे मूल्यमापन करत आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.