नवी दिल्ली - भारताने मिशन शक्ती चाचणीद्वारे अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता. मात्र भारताच्या या चाचणीमुळे अंतराळात कचरा पसरला असून, त्यामुळे अंतराळ स्थानकाला धोका निर्माण झाल्याचा आरोप नासाने केला होता. या आरोपाला आता डीआरडीओ प्रमुखांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिशन शक्तीच्या चाचणीमुळे निर्माण झालेला कचरा 45 दिवसांमध्ये नष्ट होईल, अशी माहिती डीआरडीओप्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिली. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डीआरडीओप्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, ''भारताने या चाचणीसाठी वापरलेल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची क्षमता एक हजार किमीपर्यंत मारा करण्याची होती. मात्र इतर देशांच्या उपग्रहांना धोका पोहोचू नये यासाठी आम्ही ही चाचणी करण्यासाठी लोअर ऑर्बिटची निवड केली होती. या चाचणीमुळे निर्माण झालेला अंतराळ कचरा 45 दिवसांत नष्ट होईल ''
मिशन शक्तीमुळे उद्ध्वस्त उपग्रहाचे अवशेष 45 दिवसांत नष्ट होतील - डीआरडीओ प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 19:43 IST