लेकासाठी कुटुंबीयांची धडपड; उपचारासाठी २६ कोटी खर्च, सरकारकडे मदतीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:55 IST2025-02-15T11:54:35+5:302025-02-15T11:55:12+5:30
एक कुटुंब आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून घरोघरी भटकत आहे.

फोटो - ABP News
अलीगडमधील एक कुटुंब आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून घरोघरी भटकत आहे. हे कुटुंब गेल्या २२ महिन्यांपासून त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी घरोघरी भटकत आहे, परंतु अद्याप कोणीही कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे आलेलं नाही. कुटुंबाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मुलाच्या उपचारात मदत करण्याची विनंती केली आहे. परंतु अद्याप सरकारकडून देखील कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मुलाच्या आजाराच्या उपचारासाठी कुटुंबाला तब्बल २६ कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागेल.
स्वप्नील खुराणा हा मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे आणि सध्या एका खासगी आंतरराष्ट्रीय बँकेत काम करतो. २०२१ मध्ये त्यांचं लग्न अलीगडच्या हरमीत कौरशी झाले, लग्नानंतर त्याला अंगद नावाचा मुलगा झाला. जेव्हा मुलाला दीड वर्ष झालं तरी चालता येत नव्हतं, तेव्हा त्यांनी मुलाला बंगळुरू, जबलपूर आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं. उपचारादरम्यान असं आढळून आलं की, मुलाला 'ड्यूचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी' नावाच्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे. मुलांचे स्नायू हळूहळू कमकुवत होत आहेत.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवनरक्षक जीन थेरपी इंजेक्शन देणं अत्यंत आवश्यक आहे ज्याची किंमत २६ कोटी रुपये असते. कुटुंबाने अलीगड आणि इतर ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांच्या मुलांना वाचवण्याचं आवाहन अधिकाऱ्यांना केलं आहे. आजपर्यंत त्यांना कुठूनही आशेचा किरण दिसलेला नाही.
कुटुंबाने सांगितलं की, त्यांनी अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्रंही लिहिली, परंतु आजपर्यंत त्यांना त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी कुठूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच्या कुटुंबाला अजूनही सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. सध्या हे कुटुंब आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी सतत प्रार्थना करताना दिसत आहे.