अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:30 IST2025-11-13T15:12:23+5:302025-11-13T15:30:17+5:30
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या चौकशीत फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय मान्यता प्राधिकरणाने विद्यापीठाला त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्या महाविद्यालयांना NAAC द्वारे मान्यताप्राप्त असल्याचा खोटा दावा केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. यंत्रणांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. स्फोटांप्रकरणी फरिदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेज चौकशीच्या कक्षेत आहे. दरम्यान, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (NAAC) अल-फलाह विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर मान्यता दाखवली होती, ही मान्यता खोटी आहे. या प्रकरणी आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
चौकशी सुरू असलेल्या अल फलाह विद्यापीठाला खोट्या मान्यता दाव्यासाठी NAAC ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अल-फलाह विद्यापीठाने मान्यता मिळवलेली नाही किंवा A & A साठी चक्र १ मध्ये भाग घेतलेला नाही. त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या प्रदर्शित केले आहे की "अल-फलाह विद्यापीठ हे अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टचे एक उपक्रम आहे, हे कॅम्पसमध्ये तीन महाविद्यालये चालवते", असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
अल फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ब्राउन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (२००८ पासून), आणि अल-फलाह स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग (२००६ पासून, NAAC ला A ग्रेड देण्यात आला आहे). हे पूर्णपणे खोटे आहे आणि जनतेची, विशेषतः पालकांची, विद्यार्थ्यांची आणि भागधारकांची दिशाभूल करत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
एनआयएच्या पथकाने छापा टाकला
जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या संयुक्त पथकाने महाविद्यालयाच्या परिसरात छापा टाकला. तपासादरम्यान, अल फलाह विद्यापीठाच्या खोली क्रमांक ४ आणि खोली क्रमांक १३ मधून दोन डायरी जप्त करण्यात आल्या. या डायरींमध्ये गुप्त कोड देखील सापडले आहेत, त्यांचा दिल्ली बॉम्बस्फोटांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
४ शहरांमध्ये स्फो घडवायचे होते
डॉक्टर मॉड्यूलमधील हे दहशतवादी देशातील चार शहरांना लक्ष्य करण्याचा विचार करत होते.प्रत्येक गटाला एकाच शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती, असे तपास यंत्रणांनी सांगितले.