अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:08 IST2025-12-10T20:06:23+5:302025-12-10T20:08:03+5:30
Akhilesh Yadav Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही केलं सविस्तर भाष्य

अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
Akhilesh Yadav Ayodhya Ram Mandir: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एका विशेष कार्यक्रमात अयोध्या येथील राम मंदिरात दर्शनासाठी जाण्याबाबत विषयावर भाष्य केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही त्यांनी रोखठोक मत मांडले. "उत्तर प्रदेशची निवडणूक ही केवळ राज्याची निवडणूक नसते, ती राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक असते. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांसारखे प्रमुख राष्ट्रीय नेते उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. त्यामुळे २०२७च्या उत्तर प्रदेश निवडणुका स्वाभाविकपणे देशाचे राजकीय केंद्र बनतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणादरम्यान बोलताना अखिलेश यादव यांनी अयोध्येतील राम मंदिराला कधी भेट देणार हेदेखील सांगितले.
...तेव्हा राम मंदिरात जाणार
अखिलेश यांनी कार्यक्रमादरम्यान धर्म आणि मंदिरांच्या प्रश्नावर सविस्तरपणे भाष्य केले. "२०१३ मध्ये केदारनाथ आपत्तीनंतर माजी सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांना त्या मंदिरापासून प्रेरित होऊन मंदिर बांधण्याची इच्छा झाली होती. म्हणूनच इटावामध्ये केदारनाथ मंदिर बांधले जात आहे. केदारनाथपासून प्रेरित एक मंदिर तिथे बांधले जात आहे आणि श्रावण महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण करून दर्शन आणि पूजा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा ते मंदिर तयार होईल, तेव्हा मी भगवान रामाचे दर्शन घेण्यासाठीही जाईन. हे सर्व देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. जेव्हा मला बोलावणे येईल तेव्हा मी जाईन," असे ते म्हणाले.
वर्षानुवर्षे हनुमानाची पूजा
"निवडणुकीसाठी ४०० दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक असल्याने समाजवादी पक्ष लोकसभा निवडणुकीपासूनच याची तयारी करत आहे. आमच्या गावात बजरंग बलीची पूजा बऱ्याच काळापासून केली जाते. माजी सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांनीही वर्षानुवर्षे हनुमानाची पूजा केली. आता केदारनाथपासून प्रेरित होऊन मंदिर बांधले जात आहे. या मंदिरासाठी जमीन खरेदी करण्यात आली होती आणि मंदिरासाठी घेतलेली जमीन 'शिवशक्ती अक्ष रेखा' सारख्याच अक्षाशी जुळते हा एक भाग्यवान योगायोग आहे," असेही अखिलेश यादव म्हणाले.
प्रत्येक घरात एक मंदिर
"भाजपला हे माहित नाही उत्तर प्रदेशात प्रत्येक घरात एक मंदिर आहे. अगदी गरीब कुटुंबातही देवाला समर्पित मंदिर नसेल तरीही एखादे देवाचे कॅलेंडर आहे. इटावामधील केदारनाथ मंदिराचा संदर्भ देणे येथे गरजेचे आहे. त्यात डाव्या बाजूला एक बाळकृष्ण आणि उजव्या बाजूला एक रामलला असेल," असे ते म्हणाले.