‘अखिलेश मुस्लिमविरोधी’
By Admin | Updated: January 17, 2017 05:38 IST2017-01-17T05:38:40+5:302017-01-17T05:38:40+5:30
समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या तीव्र संघर्षात मुलायमसिंग यादव यांचे दु:ख पुन्हा एकदा उफाळून वर आले

‘अखिलेश मुस्लिमविरोधी’
मीना-कमल,
लखनौ- समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या तीव्र संघर्षात मुलायमसिंग यादव यांचे दु:ख पुन्हा एकदा उफाळून वर आले व त्यांनी पुत्र अखिलेश यादव यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्लाबोल केला. माझा मुलगा विरोधकांच्या हातचे खेळणे झाला असून मुस्लिमांना पक्षापासून दूर लोटण्याचे काम तो करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. मुस्लिमांच्या हितासाठी वेळप्रसंगी अखिलेशविरोधात निवडणूक रिंगणात उभे राहण्यासही मागेपुढे बघणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कुटुंबातील यादवीने अगतिक झालेले मुलायमसिंग सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना भेटले व व्यथा मांडली. ते म्हणाले, अखिलेश यादव यांना आता माझ्यासोबत बोलायलाही आवडत नसून बोलावल्यावरही ते भेटण्यास येत नाहीत. वादावर तोडग्यासाठी चर्चेकरिताही ते रामगोपाल यादव यांनाच पुढे करतात. तोडगा निघण्यापूर्वीच प्रयत्न अपयशी ठरतात. मुस्लिम बांधवांचा समाजवादी पार्टीवर अतूट विश्वास आहे. परंतु अखिलेश यांच्या वर्तणुकीमुळे हा समुदाय पक्षापासून दुरावतो आहे. मुस्लिमांच्या विश्वासाला तडा गेला तर पक्षाला विधानसभा निवडणुकीत फार मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली.