अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिराच्या विकासासाठी मागितला निधी, मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले २० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:17 IST2025-03-21T15:15:42+5:302025-03-21T15:17:54+5:30
Akbaruddin Owaisi Lal Darwaja Mandir Hyderabad: हैदराबादमध्ये असलेल्या एका मंदिराच्या विकासासाठी एका आमदाराने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सरकारकडे निधी मागितला, ते आमदार आहेत अकबरुद्दीन ओवेसी!

अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिराच्या विकासासाठी मागितला निधी, मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले २० कोटी
Akbaruddin Owaisi Lal Darwaja Mandir News: अकबरुद्दीन ओवेसी आणि मंदिर विकासासाठी निधीची मागणी, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. हे खरंय का? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल, तर हो, खरं आहे. तेलंगणा विधानसभेत एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी ही मागणी केली. आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही लगेच त्यांची मागणी मान्य करत २० कोटी रुपये देणार, अशी घोषणा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधील लाल दरवाजा सिम्हा वाहिनी श्री महाकाली मंदिराचा विस्तार करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.
अकबरुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
विधानसभेत बोलताना अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले, "लाल दरवाजा असलेलं शहरातील किती मोठं मंदिर आहे. त्याला आणखी मोठ बनवू शकतो. तेथील लोकांना पर्यायी जागा दिली जाऊ शकते. ते लोक हिंदूच्या हिताच्या गोष्टी करतात आणि मुसलमानांसोबत लढवत राहतात. त्यांनाही आजपर्यंत लाल दरवाजा मंदिरापर्यंत बोलता आलेलं नाही. आज बघा त्या मंदिराचं काम आज ईश्वर एका मुसलमानाकडून करून घेत आहे."
मुख्यमंत्री रेड्डींनी दिले २० कोटी
अकबरुद्दीन ओवेसी यांनी मंदिर विकासासाठी निधी मागितला. त्यांची मागणी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी लगेच मागणी मान्य केली.
"लाल मंदिरासाठी जी निधीची मागणी केली गेली आहे. त्यासाठी २० कोटी रुपये देण्याची घोषणा मी करतो आणि सामाजिक विकास निधीतून हा पैसा दिला जाईल. लाल दरवाजा मंदिराचा एक इतिहास आहे. तो आम्ही सोडणार नाही. मंदिर बनवण्याची जबाबदारी माझी आहे आणि दर्शन घडवण्याची जबाबदारी तुमची आहे", मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले.
मंदिर समितीने मानले रेड्डी आणि ओवेसींचे आभार
सरकारने २० कोटींचा निधी जाहीर केल्यानंतर लाल दरवाजा मंदिर समितीने आभार मानले. मंदिर समितीने एका बैठकीत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचे आभार मानणारा ठराव मंजूर केला. त्याचबरोबर मिठाई वाटून या घोषणेचे स्वागत केले.
मंदिर समितीने म्हटले आहे की, आम्ही रेवंत रेड्डी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांचे आभार मानतो, त्यांनी हा मुद्दा सातत्याने मांडला.