‘आकाश’ क्षेपणास्त्र लष्कराच्या सेवेत
By Admin | Updated: May 6, 2015 00:43 IST2015-05-05T23:47:49+5:302015-05-06T00:43:30+5:30
जमिनीवरून हवेत मारा करणारे ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेग असलेले (सुपरसॉनिक) आकाश हे क्षेपणास्त्र मंगळवारी लष्कराच्या सेवेत रुजू झाले.

‘आकाश’ क्षेपणास्त्र लष्कराच्या सेवेत
नवी दिल्ली : जमिनीवरून हवेत मारा करणारे ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेग असलेले (सुपरसॉनिक) आकाश हे क्षेपणास्त्र मंगळवारी लष्कराच्या सेवेत रुजू झाले. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर ‘आकाश’ला रीतसर लष्करात समाविष्ट करण्यात आले.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र लष्कराच्या हवाई संरक्षण कोअरला मदत करील. आकाश हे स्वदेशीकरणाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे लष्करप्रमुख जन. दलबीरसिंग यांनी लोकार्पण समारंभात म्हटले.
टाळ्या वाजवू नका
माझे भाषण संपल्यावर कृपया टाळ्या वाजवू नका, असे लष्करप्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांनी मंगळवारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले. लष्करी पोशाखात असताना टाळ्या वाजवू नये, असा एक संकेत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काय आहेत वैशिष्ट्ये
> ९६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे ‘आकाश’ची निर्मिती.
> जमिनीवरून हवेत २५ कि.मी. अंतर आणि २० कि.मी. उंचीवरील अनेक लक्ष्ये एकाच वेळी अचूक भेदण्याची क्षमता.
> प्रतिकूल वातावरणातही शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर आणि मानवरहित विमानांना पाडण्यास सक्षम.
> शंभरावर क्षेपणास्त्रांच्या समावेशासाठी १९,५०० कोटी रुपये खर्च. पहिली पूर्ण रेजिमेंट जून-जुलैपर्यंत सज्ज. दुसरी रेजिमेंट २०१६ च्या अखेरीस पूर्णत्वास.
> यापूर्वीच हवाई दलात समावेश. लष्करासाठी यंत्रणेत आवृत्तीत बदल. स्वयंचलित यंत्रणा. आवश्यकतेनुसार वाहनावर ठेवूनही वापरता येणार.
> डीआरडीओने १९८४ मध्ये सुरू केलेल्या एकात्म क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित पाच कोटी क्षेपणास्त्र यंत्रणांमध्ये ‘आकाश’चा समावेश.