अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 08:58 IST2023-11-10T08:58:06+5:302023-11-10T08:58:57+5:30
या प्रकाराबद्दल भारतीय दंड विधानांतर्गत अजित पवार गटावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.

अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप
नवी दिल्ली : अजित पवार गटाने सादर केलेल्या ८,९०० प्रतिज्ञापत्रांमध्ये २४ प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. वीस हजार चुकीची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. अनेक प्रतिज्ञापत्रे मृत आणि अल्पवयीनांची असून, त्यात अस्तित्वात नसलेल्या पदांचा उल्लेख आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने गुरुवारी निवडणूक आयोगापुढे केला.
या प्रकाराबद्दल भारतीय दंड विधानांतर्गत अजित पवार गटावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. राष्ट्रवादीमधील फुटीवर आयोगापुढे २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होणार आहे. गुरुवारी दोन्ही गटांकडून दीड तास युक्तिवाद झाल्यावर आयोगाने हा निर्णय जाहीर केला. सुरुवातीच्या दोन तारखांना अजित पवार गटाकडून युक्तिवाद झाला होता.
उपस्थिती
शरद पवार गट :
शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, खा. वंदना चव्हाण
अजित पवार गट :
खा. सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, आनंद परांजपे, सूरज चव्हाण, संजय तटकरे.