दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, दहशतवादी किंवा समाजविरोधी घटकांकडून धोका असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच सर्व विमानतळांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून प्रत्येक हालचालीवर सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे.
यासंदर्भात नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने सूचना जारी केल्या आहेत. त्यात असे म्हटले आहे की, "केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, सर्व यंत्रणांना देशातील सर्व विमानतळ, धावपट्ट्या, एअरफील्ड, हवाई दल स्थानके आणि हेलिपॅड्सवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दहशतवादी देशातील विमानतळांवर हल्ला करण्याची शक्यता आहे."
पाकिस्तानी दहशतवादी गटाच्या कारवायांशी संबंधित विशिष्ट माहितीवर आधारित आहे. ४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या या आदेशात, बीसीएएसने असेही म्हटले आहे की, स्थानिक पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, गुप्तचर विभाग आणि इतर संबंधित एजन्सींशी समन्वय राखला पाहिजे, असेही बीसीएएसने सूचित केले आहे.
दरम्यान, विमानतळ टर्मिनल, पार्किंग आणि इतर संवेदनशील भागांत गस्त वाढवण्यात यावी. शिवाय, सर्व सीसीटीव्ही यंत्रणा नॉन-स्टॉप सक्रिय मोडमध्ये ठेवा. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित तपासणी करण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले. याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.