बिहारमध्ये राजकीय पक्षांत रंगणार ‘एअर वाॅर’; कोणाचे नेते सर्वाधिक हेलिकॉप्टरने येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:15 IST2025-10-16T08:14:57+5:302025-10-16T08:15:26+5:30
Bihar election 2025: पाटणा विमानतळाचा वापर ‘कमांड सेंटर’ म्हणून होणार, निवडणुकीची लढाई जमिनीवर लढली जाणार असली तरी राजकीय पक्ष विरोधकांवर आकाशातून मारा करण्याची योजना आखत आहेत.

बिहारमध्ये राजकीय पक्षांत रंगणार ‘एअर वाॅर’; कोणाचे नेते सर्वाधिक हेलिकॉप्टरने येणार
- चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय पक्षांनी विधानसभेची लढाई जिंकण्यासाठी ‘एअर स्ट्राइक’चा मार्ग निवडला आहे आणि पाटणा विमानतळाचा उपयोग ‘कमांड सेंटर’ म्हणून होणार आहे. थोडक्यात, निवडणुकीच्या प्रचारात हेलिकॉप्टरचा आवाज अख्ख्या बिहारमध्ये ऐकायला मिळणार आहे.
निवडणुकीची लढाई जमिनीवर लढली जाणार असली तरी राजकीय पक्ष विरोधकांवर आकाशातून मारा करण्याची योजना आखत आहेत. यात भारतीय जनता पक्ष पहिल्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने पाच ते सहा हेलिकॉप्टर बुक केली आहेत. काँग्रेसने तीन हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूकडे दोन, माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या ‘राजद’कडे दोन आणि ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विरोधकांवर एअर स्ट्राइक करताना दिसतील.
३० हेलिकॉप्टर पार्क करण्याची क्षमता
पाटणा विमानतळाची ३० हेलिकॉप्टर पार्क करण्याची क्षमता आहे. ही बाब लक्षात घेता व्यवस्थापन पूर्णपणे सतर्क आहे. दररोज १२ ते १५ हेलिकॉप्टर येथून उड्डाण करणार आहेत. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टरचा उपयोग करणार आहे. याशिवाय, नितीशकुमार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर होणार आहे. हेलिकॉप्टरने येता-जाता वस्तूंची तपासणी होईल. आयकर खात्याची टीमही तैनात करण्यात आली आहे. एका हेलिकॉप्टरचे भाडे ताशी २.१० लाख रुपये आहे. किमान ३ तासांसाठी हेलिकॉप्टर बुक करावे लागेल.