एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पुढील महिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:15 IST2019-10-22T03:58:38+5:302019-10-22T06:15:00+5:30
एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागविण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पुढील महिन्यात
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागविण्याची शक्यता आहे. या विमान कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचे सरकारने ठरविले आहे. त्या प्रकारे या निविदा मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षीच केंद्र सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यावेळी ही संपूर्ण विमान कंपनीच विकण्यासाठी निविदा मागविण्याचे सरकारने निश्चित केले आहे. ज्यांना विमान कंपनीच्या खरेदीत रस आहे, त्यांच्याकडून तसे प्राथमिक स्वारस्यपत्र मागविण्यासाठी पुढील महिन्यात प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
निर्गुंतवणुकीच्या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्याने आपला एअर इंडियातील संपूर्ण हिस्सा विकण्याचे ठरवितानाच केंद्र सरकारने त्यासाठीच्या काही अटी शिथिल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, जी कंपनी एअर इंडिया विकत घेईल, तिला या विमान कंपनीचे नाव बदलण्याचाही अधिकार राहील, असे आधीच सरकारने ठरविले आहे. एअर इंडियाकडे देशा-विदेशांत अनेक मालमत्ता आहेत. त्याही सरकार विकणार का, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही कंपनी विकण्याबाबत एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने अलीकडेच कर्मचारी संघटनांशी चर्चा केली होती.
कर्ज आणि तोटा
एअर इंडियावर५८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय एअर इंडियाचा तोटा काही कोटींमध्ये आहे. विमानांना लागणाºया इंधनाची रक्कम तेल कंपन्यांना देण्यासाठीही एअर इंडियाकडे पैसे नसतात, असे अनेकदा दिसून आले आहे.