हॉस्टेलच्या छतावर सापडला विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’, अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआरदेखील हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 08:07 IST2025-06-14T08:06:44+5:302025-06-14T08:07:14+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर २७ तासांनी शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरोला (एएआयबी) विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) सापडला आहे. हा ब्लॅक बॉक्स बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या छतावर सापडला.

हॉस्टेलच्या छतावर सापडला विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’, अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआरदेखील हात
अहमदाबाद - अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर २७ तासांनी शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरोला (एएआयबी) विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) सापडला आहे. हा ब्लॅक बॉक्स बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या छतावर सापडला. या ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणातून अपघाताचे नेमके कारण शोधता येईल. अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यातून डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर देखील सापडला आहे.
आतापर्यंत २७० मृतदेह हाती लागले असून सात जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, ड्रीमलाइनर विमानांची तपासणी करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यात २६ बोइंग ७८७-८ व ७ बोइंग ७८७-९ विमाने आहेत. (वृत्तसंस्था)
मोदी यांनी घेतली विश्वासकुमार रमेश यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात भेट देऊन विमान अपघातातील जखमी नागरिकांची विचारपूस केली. या भीषण दुर्घटनेतून वाचलेले एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांचीही मोदी यांनी खास भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अपघातातील २५ जखमींवर सिव्हिल रुग्णालयातील सी१७ वॉर्डामध्ये उपचार सुरू आहेत. मोदी यांनी यावेळी डॉक्टरांशीही संवाद साधला.
केंद्रीय तपास संस्थांची विमान दुर्घटनास्थळाला भेट
राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) इतर केंद्रीय तपास संस्थांनी शुक्रवारी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या स्थळाला भेट दिली. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी)ने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.
विमानाचे अवशेष तसेच विमान ज्या इमारतीवर कोसळले तिची नासधूस झाल्याने पसरलेला ढिगारा या गोष्टी शुक्रवारी तिथून हटविण्यात आल्या.
अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही मृतदेहाची ओळख अजून पटू शकलेली नाही.
अपघातस्थळाची पंतप्रधानांकडून पाहणी
एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, त्या अपघातस्थळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाहणी केली. या दुर्घटनेतील जखमींची त्यांनी अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. ओळख पटलेल्या मृतांपैकी सात जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या सुरू आहेत. आतापर्यंत अपघातग्रस्तांपैकी १९२ कुटुंबांचे डीएनए नमुने गोळा करण्यात
आले आहेत.
एअर इंडियाच्या विमानाचे फुकेतमध्ये इमर्जन्सी लँडिंग
नवी दिल्ली : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून शुक्रवारी थायलंडच्या फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित विमानतळावर उतरल्यानंतर त्याची अनिवार्य सुरक्षा चाचणी केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
इमर्जन्सी लँडिंग केलेल्या एअर इंडियाच्या ‘एआय ३७९’ विमानात १५६ पेक्षा अधिक प्रवासी होते. दिल्लीला येण्यासाठी या विमानाने उड्डाण केल्यांनतर काही वेळात सुरक्षा अलर्ट मिळाला. त्यानंतर विमानाच्या मार्गात बदल करत फुकेत येथे विमानाचे लँडिंग करण्यात आले.