१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:33 IST2025-07-12T16:33:16+5:302025-07-12T16:33:32+5:30
Air India : भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
गुजरातच्या भुज विमानतळावर आज प्रवाशांनी एअर इंडियाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आसनांच्या कमतरतेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही, तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती.
'एअर इंडिया'वर गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप
प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर 'गैरव्यवस्थापना'चे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी आगाऊ बुकिंग केले होते, परंतु त्यांना सीट मिळाली नाही, तर त्यांना महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचे होते. एअरलाईनच्या या नियोजनाअभावी त्यांचा पूर्ण दिवस खराब झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
१८० ऐवजी १५५ आसनी विमान
प्रवाशांनी माध्यमांना सांगितले की, जेव्हा त्यांनी एअरलाईन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की मुंबईला जाणाऱ्या विमानासाठी १८० आसनी विमान येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी १५५ आसनी विमान आले. कदाचित विमानात बिघाड झाल्यामुळे ऐनवेळी विमान बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.
प्रवाशांची गैरसोय, महत्त्वाचे कामं रद्द
एअरलाईन अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था एका खासगी हॉटेलमध्ये केली आहे. तसेच, प्रवाशांना त्यांची फ्लाइट री-शेड्यूल करण्याचा किंवा तिकिटाचे पैसे परत घेण्याचा (रिफंड) पर्याय दिला आहे. मात्र, फ्लाइटमध्ये चढू न शकल्याने अनेक प्रवाशांची महत्त्वाची मीटिंगची वेळ निघून गेल्याने ते निराश होते, तर काही जण नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाऊ न शकल्याने दुःखी होते. एका व्यक्तीला व्यवसायाच्या कामासाठी आज मुंबईला पोहोचणे अत्यंत गरजेचे होते, पण त्याला जाता आले नाही. एअर इंडियाच्या या गलथान कारभाराने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.