विमान कोसळून लागलेल्या आगीत बाळासाठी ढाल बनली आई; उपचारासाठी स्वतःची त्वचाही मुलाला दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:56 IST2025-07-28T17:50:34+5:302025-07-28T17:56:32+5:30
अहमदाबाद विमान अपघातातून मनिषा कछडिया या त्यांच्या आठ महिन्यांचा बाळासाठी ढाल बनल्या होत्या.

विमान कोसळून लागलेल्या आगीत बाळासाठी ढाल बनली आई; उपचारासाठी स्वतःची त्वचाही मुलाला दिली
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमधीलएअर इंडिया विमान अपघाताच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. या विमान अपघात विमानातील प्रवाशांसह एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान निवासी भागात कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी देखील झाले आहेत. अशातच या अपघातातून बचावलेल्या आईचा आणि तिच्या आठ महिन्यांच्या बाळाची थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. विमान कोसळल्यानंतर जन्मदात्या आईने ढाल बनून तिच्या मुलाला वाचवलं.
१२ जून रोजी एअर इंडियाचे विमान मेघनीनगर येथील बीजे मेडिकल कॉलेजजवळील एका निवासी इमारतीवर कोसळले होते. विमान कोसळल्यानंतर त्यातील इंधनाने पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणात स्फोट झाला. यावेळी मनीषा कछडिया त्यांचा मुलगा ध्यांशसह त्या इमारतीत उपस्थित होत्या. पण धगधगत्या आगीची, दाट धुराच्या आणि मृत्यूची पर्वा न करता मनीषा त्यांच्या ८ महिन्यांच्या मुलासाठी ढाल बनल्या. त्यांनी मुलाला कवटाळून घेतले आणि त्याचा जीव वाचवला.
या विमान अपघातात ध्यांश आणि मनीषा कछडिया दोघेही गंभीरपणे भाजले होते. मनीषा कछडिया यांनी मुलासाठी शरीराची ढाल बनवल्यामुळे ध्यांशचा जीव वाचू शकला. एवढंच नाही तर मनीषा यांनी मुलाच्या जळालेल्या भागांवर स्किन ग्राफ्टसाठी स्वतःची त्वचा देखील दान केली. उपचारानंतर दोघांनाही गेल्या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
विमान कोसळले तेव्हा मनीषा आणि त्यांचा मुलगा बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेल आणि मेघनानिगर निवासी क्वार्टरमध्ये होते. विमान कोसळल्यावर मनीषा ध्यांशला घेऊन इमारतीबाहेर पळाल्या. आजूबाजूला धूर आणि आग होती. त्यामुळे काहीही दिसत नव्हतं. दोघेही गरम हवेने गंभीरपणे भाजले होते. मनीषाला २५ टक्के भाजल्या होत्या. त्याचा हात आणि चेहऱ्याचा भाग जळाला होता. आठ महिन्यांच्या ध्यांशची प्रकृती आणखी वाईट होती कारण तो ३६ टक्के भाजला होता. त्याच्या चेहऱ्यावर, दोन्ही हातांवर, पोटावर आणि छातीवर भाजले होते. दोघांनाही उपचारासाठी केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुलाच्या जखमा बऱ्या करण्यासाठी मुलाची स्वतःची त्वचा आणि आईची स्किन ग्राफ्ट वापरली गेली. मुलाचे वय हा एक मोठा घटक होता. जखमांना संसर्ग होऊ नये आणि त्याची वाढ सामान्य राहावी याचीही आम्ही काळजी घेत होतो, असं प्लास्टिक सर्जन डॉ. ऋत्विज पारीख म्हणाले. भाजल्यामुळे बाळाच्या फुफ्फुसांची एक बाजू रक्ताने भरलेली होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. फुफ्फुसांचा पूर्णपणे विस्तार करण्यासाठी इंटरकोस्टल ड्रेनेज ट्यूब घालण्यात आली होत. इंटरकोस्टल ड्रेनेज ट्यूब ही एक प्रकारची ट्यूब आहे जी फुफ्फुसातून द्रव किंवा हवा काढून टाकण्यासाठी छातीत घातली जाते.