विमानाच्या अपहरणाचा हायअलर्ट!
By Admin | Updated: January 5, 2015 07:27 IST2015-01-05T07:27:45+5:302015-01-05T07:27:45+5:30
एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाचे अपहरण करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असल्याची खबर गुप्तचर यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर देशभरातील विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला

विमानाच्या अपहरणाचा हायअलर्ट!
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाचे अपहरण करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असल्याची खबर गुप्तचर यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर देशभरातील विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, ‘हायअलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
विमान अपहरणरोधी सर्व उपाययोजना केल्या गेल्या आहेत.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रवाशांसोबतच कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. अपहरणासाठी एअर इंडियाच्या विमानाला लक्ष्य बनविले जाऊ शकते, याबाबत गुप्तचर संस्थांना ठोस सूचना मिळाली आहे. १९९९ साली दहशतवाद्यांनी एअर इंडियाच्या आयसी ८१४ विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदहारला नेले होते. तशाच प्रकारे विमान अपहरणाचा आणखी एक डाव साधण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. यंदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक
ओबामा गणराज्य दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून येत आहेत. त्या अनुषंगाने राजधानीतील सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच कडक करण्यात आली आहे.
अनेक टप्प्यांत ही सुरक्षा व्यवस्था विभागण्यात आली असून, त्याचे कठोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानात चढण्यापूर्वी शिडीवर अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जात आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, विमानतळ कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या सामानाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात एलएमजीचे कमांडो सतत पाळतीवर असतील. फ्लाइट मार्शलची संख्या वाढविण्यात आली असून, विमानातील कर्मचाऱ्यांना संशयित प्रवाशांबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)