फक्त सेक्स चॅटसाठी देशाबरोबर गद्दारी! इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:01 IST2018-02-09T09:14:17+5:302018-02-12T16:01:03+5:30
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली.

फक्त सेक्स चॅटसाठी देशाबरोबर गद्दारी! इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक
नवी दिल्ली - पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली. मारवाह (51) हवाई दलाच्या मुख्यालयातून त्याच्या मोबाइलवर महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअॅपवरुन आयएसआयला पाठवायचा अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिली.
अरुण मारवाहच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर इंडियन एअर फोर्सने 31 जानेवारीला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आयएसआयने फेसबुकवरुन अरुण मारवाहला हनी ट्रॅपच्या जाळयात ओढले असे सूत्रांनी सांगितले. आयएसआय एजटसनी मॉडेल असल्याचे भासवून त्याला भुरळ घातली. आठवडाभरा लैंगिक भावना उत्तेजना चाळवणारे चॅट केल्यानंतर तो आयएएफच्या युद्ध सरावाची माहिती द्यायला तयार झाला. या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेले नाहीत. फक्त सेक्स चॅटच्या मोहापायी तो ही गुप्त माहिती आयएसआयला देत होता. युद्धाशी संबंधित लढाऊ विमानांच्या सरावाच्या माहितीची कागदपत्रे त्याने आयएसआयला पुरवली. त्याच्यामुळे गगन शक्ती या इंडियन एअरफोर्सच्या सरावाची माहिती पाकिस्तानला मिळाली.
अरुण मारवाहला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून लोधी कॉलनीमध्ये त्याची चौकशी सुरु आहे. त्याचा कोणी साथीदार होता का? याचीही चौकशी केली जाणार आहे. गुप्तचर कायद्याच्या कलम 3 आणि 5 अंतर्गत मारवाहा विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. त्याचा फोन जप्त करुन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. मुख्यालयात पोस्टिंग असल्यामुळे हवाई दलाची महत्वाची माहिती आपल्याला मिळाली अशी कबुली त्याने चौकशीत दिली आहे.