वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:50 IST2025-04-20T17:48:07+5:302025-04-20T17:50:18+5:30
यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS), वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) यासह अनेक पक्षांचे हजारो लोक आणि सदस्य उपस्थित होते.

वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या वक्फ कायद्याविरोधात काही राज्यांमध्ये निदर्शने होताना दिसत आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. यातच शनिवारी रात्री (१९ एप्रिल २०२५) ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने हैदराबादेत एका सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याला एआयएमआयएमनेही (AIMIM) पाठिंबा दिला.
दरम्यान, ३० एप्रिल २०२५ रोजी ब्लॅकआउट निषेध करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. यात रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येतील. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय दारुस्सलाम येथे आयोजित 'वक्फ वाचवा, संविधान वाचवा' जाहीर सभेत, ही घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS), वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) यासह अनेक पक्षांचे हजारो लोक आणि सदस्य उपस्थित होते.
'आपल्याला संपवू इच्छिणाऱ्या शक्तींविरुद्ध आंदोलन' -
एआयएमआयएम प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "हे आंदोलन आपल्याला संपवू इच्छिणाऱ्या शक्तींविरोधात आहे, मात्र आपण पुढेही वाढत राहू. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शक्तींचा पराभव होईल. आम्ही झुकणार नाही. जेव्हा मी संसदेत कायदा फाडला, तेव्हा मी माझ्या इतर धर्मातील सर्व बंधू आणि भगिनींच्या वतीने ते केले. ज्यांना अशा प्रकारच्या क्रूर कायद्यांचा फटका बसेल."
१८ मे रोजी राउंड-टेबल मीटिंग -
या सर्वसाधारण सभेत १८ मे रोजी शहर पातळीवर राउंड-टेबल मीटिंग आयोजित करण्याचा आणि नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये अशाच बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मे रोजी हैदराबादमधील ईदगाह बिलाली हॉकी ग्राउंडवर महिलांच्या एक सभेचे आयोजित केली जाईल. यानंतर, २५ मे रोजी हैदराबादमध्ये दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत मानवी साखळी करून निषेध करण्यात येईल आणि १ जून रोजी धरणे दिले जाईल. याशिवाय, "स्थानिक नेतृत्वाशी सल्लामसलत करून आंध्र आणि तेलंगणा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सभा घेतल्या जातील," अशी घोषणाही एआयएमपीएलबी नेतृत्वाने रविवारी केली.