अयोध्या जगाची आध्यात्मिक राजधानी आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्याचे ध्येय: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:41 IST2025-11-03T16:41:08+5:302025-11-03T16:41:40+5:30
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, विकास प्रकल्पांमध्ये अयोध्येची सांस्कृतिक ओळख, धार्मिक गौरव आणि पर्यावरणीय संतुलन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जावे.

अयोध्या जगाची आध्यात्मिक राजधानी आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्याचे ध्येय: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “अयोध्या महायोजना २०३१” संदर्भातील प्रस्तावांचा आढावा घेताना म्हटलं की, अयोध्येचा विकास हा भव्यता, आस्था आणि आधुनिकता या तिन्हींचा समन्वय असावा. या महायोजनेचे उद्दिष्ट अयोध्येला सुनियोजित, सुव्यवस्थित आणि शाश्वत विकासासह जगातील आध्यात्मिक राजधानी म्हणून स्थापित करण्याचे आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की विकास प्रकल्पांमध्ये अयोध्येची सांस्कृतिक ओळख, धार्मिक गौरव आणि पर्यावरणीय संतुलन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जावे.
अयोध्या व्हिजन २०४७
मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले की “अयोध्या व्हिजन २०४७” अंतर्गत अयोध्येला जागतिक आध्यात्मिक, ज्ञान आणि उत्सव नगरी म्हणून विकसित करण्यात येईल. यासोबतच तीर्थपर्यटनासाठी अनुकूल पायाभूत सुविधा, ऐतिहासिक परिक्रमा मार्ग, हेरिटेज वॉक, हिरव्या ऊर्जेवर आधारित स्मार्ट सिटी आणि आधुनिक नागरी सुविधा या योजनेत समाविष्ट आहेत.
शाश्वत शहर नियोजनाची पायाभरणी
बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या महायोजना २०३१ चे उद्दिष्ट शहराला “ग्लोबल स्पिरिच्युअल आणि टुरिझम डेस्टिनेशन” म्हणून विकसित करण्याचे आहे. या योजनेत अयोध्या विकास क्षेत्राला १८ झोनमध्ये विभागून संतुलित जमिनीचा वापर सुनिश्चित करण्यात आला आहे. योजनेनुसार, २०३१ पर्यंत अंदाजे २४ लाख लोकसंख्या लक्षात घेऊन ५२.५६% क्षेत्र निवासी, ५.११% व्यावसायिक, ४.६५% औद्योगिक, १०.२८% सार्वजनिक उपयोगासाठी, १२.२०% वाहतुकीसाठी, आणि १४.३१% हरित व खुल्या क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री यांनी औद्योगिक आणि मिश्र वापराच्या क्षेत्रात वाढ करण्याचे तसेच पंचकोसी आणि चौदाकोसी परिक्रमा मार्गांवर विविध क्रियांसाठी जमीन आरक्षित करण्याचे निर्देश दिले.
स्मार्ट, आत्मनिर्भर आणि आधुनिक अयोध्येचे रूप
सध्या अयोध्येची लोकसंख्या सुमारे ११ लाख असून ती २०३१ पर्यंत २४ लाख आणि २०४७ पर्यंत ३५ लाख होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर नवीन टाउनशिप, भव्य प्रवेशद्वार, मल्टीलेव्हल पार्किंग, ८४ कोसी परिक्रमा मार्ग, ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे, रिंग रोड, विमानतळ, टेंपल म्युझियम, सौर ऊर्जा प्रकल्प आणि आधुनिक नागरी सुविधा या सर्व गोष्टी योजनेचा भाग आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पांमुळे अयोध्या स्मार्ट, सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनेल. अयोध्या विकास क्षेत्रात सध्या १५९ गुंतवणूक प्रकल्प मंजूर झाले असून, त्यातून सुमारे ₹८,५९४ कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्रींच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल.
वाहतूक आणि पर्यावरणीय संतुलनावर भर
अयोध्या हे शहर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने उत्कृष्टरीत्या जोडलेले आहे. पर्यटक आणि भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी बस व ट्रक टर्मिनल, पार्किंग व्यवस्था, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे. तसेच देशी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अयोध्या ही भारताच्या आत्म्याचं प्रतीक
मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या केवळ एक शहर नाही, तर भारताच्या आत्म्याचं प्रतीक आहे. तिचा विकास धार्मिक पर्यटनापुरता मर्यादित न राहता आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून प्रेरक ठरला पाहिजे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक प्रकल्प पर्यावरणीय दृष्ट्या सस्टेनेबल असावा, सरयू नदीचे तट आणि हरित पट्टे जतन केले जावेत, तसेच अनियोजित बांधकामाला आळा घालावा.