सासरच्यांचा कट आणि न्यायासाठी शेवटची हाक;९० मिनिटांच्या व्हिडीओनंतर इंजिनिअरने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:14 IST2024-12-11T09:12:46+5:302024-12-11T09:14:34+5:30
बंगळुरुमधील एका इंजिनियरच्या मृत्यूनंतर देशभरात आता पुरुषांच्या हक्कांवर वादविवाद सुरू झाला आहे

सासरच्यांचा कट आणि न्यायासाठी शेवटची हाक;९० मिनिटांच्या व्हिडीओनंतर इंजिनिअरने संपवलं जीवन
Techie Atul Subhash Death: बंगळुरूमध्ये एका एआय इंजिनिअरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. ९ डिसेंबर रोजी ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी ९० मिनिटांचा व्हिडिओ आणि २४ पानांचे एक पत्र समोर आणत आत्महत्या केली होती. माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असं सुभाष यांनी म्हटलं होतं. सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानिया, सासू, भावजय आणि चुलत सासरे यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. तसेच अतुलने उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका न्यायाधीशावरही गंभीर आरोप केले आहेत. खटला बंद करण्याच्या नावाखाली न्यायाधीशांनी ५ लाख रुपये मागितल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
अतुल सुभाषच्या आत्महत्येने देशभरात प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अतुलच्या कुटुंबाचा आरोप आहे की भारतीय कायदे स्त्रियांच्या बाजूने झुकलेले आहेत आणि पुरुषांसाठी कमी आहेत. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही न्याय मागितला आहे. अतुल सुभाष हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होता. त्याच्या घरी २४ पानांची सुसाईड नोट आढळली असून त्याने स्वतःचा जीव घेण्यापूर्वी ९० मिनिटांचा व्हिडिओ देखील शूट केला होता. ज्यामध्ये त्याने त्याच्या विभक्त पत्नीने खोटे आरोप लावले, त्याचा छळ केला आणि अनेक खटले दाखल केल्याचा आरोप केला आहे.
अतुल सुभाषने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने अनेक गुन्हे दाखल केले आहेत आणि आता ती ३ कोटींची मागणी करत आहे. आत्महत्येच्या वेळी अतुलने घातलेल्या टी-शर्टवर जस्टिस इज ड्यू असे लिहिले होते. २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या २ वर्षानंतर पत्नीने अतुलविरोधात हुंड्यासाठी छळ, खुनापासून अनैसर्गिक लैंगिक शोषणापर्यंतचे गुन्हे दाखल केले. पत्नीने तीन कोटी रुपये पोटगी मागितल्याचा आरोप अतुलने केला आहे. मला माझ्या मुलाचा चेहराही पाहू दिला नाही. लग्नानंतर पत्नीच्या वडिलांचा आजारपणात मृत्यू झाला मात्र सासरच्यांनी माझ्याविरोधात खुनाचा एफआयआर दाखल केला, असंही अतुलने म्हटलं आहे.
तसेच कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. 2 वर्षांत मला १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावे लागल्याचा दावा अतुलने केला आहे. न्यायाधीशांसमोरच पत्नीने मला आत्महत्या का केली नाही असे विचारले होते आणि हे ऐकून न्यायाधीश जोरजोरात हसायला लागल्याचा दावा अतुलने केला.
मृत्यूपूर्वी अतुलने त्याच्या मुलासाठी भेटवस्तू ठेवली आहे. जी त्याला २०३८ मध्ये १८ वर्षांचा झाल्यावर उघडायला सांगितली आहे. या वादात अतुलच्या सासरच्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये,"मला वाटते की मी आत्महत्या करावी कारण मी कमावत असलेल्या पैशाने माझे शत्रू मजबूत होत आहेत.याचा वापर मला नष्ट करण्यासाठी केला जाईल आणि हे चालूच राहील. माझ्या टॅक्सच्या पैशाने ही न्यायालय आणि पोलिस यंत्रणा मला, माझ्या कुटुंबाला आणि इतर चांगल्या लोकांना त्रास देईल," असं अतुल सुभाष म्हणताना दिसत आहे.