‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलरचा फटका; इंटरपोलचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:48 IST2026-03-20T11:48:05+5:302026-03-20T11:48:46+5:30
फ्रान्समधील ल्योन येथे मुख्यालय असलेल्या ‘इंटरपोल’ या जागतिक पोलिस सहकार्य संघटनेने आपल्या ‘२०२६ जागतिक आर्थिक फसवणुकीच्या धोक्याचे मूल्यांकन अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलरचा फटका; इंटरपोलचा धोक्याचा इशारा
नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाने आता एका भीषण संकटाचे रूप धारण केले असून, गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल ४४२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. फ्रान्समधील ल्योन येथे मुख्यालय असलेल्या ‘इंटरपोल’ या जागतिक पोलिस सहकार्य संघटनेने आपल्या ‘२०२६ जागतिक आर्थिक फसवणुकीच्या धोक्याचे मूल्यांकन अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
इंटरपोलने या फसवणुकीच्या जागतिक जोखमीला ‘उच्च’ श्रेणीमध्ये ठेवले असून, सायबर गुन्हेगार आता केवळ सामान्य तंत्रज्ञानच नव्हे, तर ‘एजेंटिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची भीती व्यक्त केली आहे.
४.५ पटीने धोकादायक
‘एजेंटिक एआय’ हे तंत्रज्ञान पारंपरिक फसवणुकीच्या पद्धतींपेक्षा ४.५ पटीने अधिक धोकादायक आहे. हे तंत्रज्ञान स्वतःहून संपूर्ण फसवणुकीचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासही सक्षम आहे. माहिती काढण्यापासून ते रॅन्समवेअरद्वारे खंडणी मागेपर्यंतची सर्व कामे हे एआय सिस्टिम मानवी हस्तक्षेपाशिवाय करू शकते.
‘फ्रॉड एज ए सर्विस’चा धोका
बाजारात आता ‘फ्रॉड-एज-ए-सर्विस’ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत. यामुळे ज्यांना तांत्रिक कौशल्य येत नाही, असे कमी अनुभवी लोकही मोठ्या प्रमाणावर आणि आर्थिक फसवणूक करू शकतात. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने खोटे आवाज, व्हिडीओ आणि मेसेजेस तयार करून सर्वसामान्य नागरिक आणि कंपन्यांची फसवणूक केली जात आहे.
गुन्हेगारीचे नवे ‘नेटवर्क’ : रिपोर्टनुसार, आता गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. मादक पदार्थांची तस्करी करणारे जुने गुन्हेगारी गट आता इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान-समर्थित फसवणुकीच्या व्यवसायात उतरले आहेत. अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर फसवणूक आता एकमेकांशी जोडली गेली असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत आहे.