अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:37 IST2025-06-21T09:36:12+5:302025-06-21T09:37:23+5:30
Ahmedabad Plane Crash: गेल्या आठवड्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर प्रसिद्ध गुजराती चित्रपट निर्माते महेश कलावाडिया उर्फ महेश जीरावाला हेसुद्धा बेपत्ता होते. आता त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड
गेल्या आठवड्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह २४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबरच हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर, मेसमधील कर्मचारी तसेच खालील रस्त्यावरून जात असलेल्या काही वाटसरूंनाही या भीषण अपघातात जीव गमवावा लागला होता. दरम्यान, या अपघातानंतर प्रसिद्ध गुजराती चित्रपट निर्माते महेश कलावाडिया उर्फ महेश जीरावाला हेसुद्धा बेपत्ता होते. आता त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. DNA चाचणीनंतर महेश जीरावाला यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला तेव्हापासून महेश जीरावाला हे बेपत्ता होते. तसेच त्यांच्या फोनचं शेवटचं लोकेशन हे घटनास्थळापासून ७०० मीटरवर सापडलं होतं, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. महेश हे सुद्धा या अपघातात सापडले असावेत, अशी शंका असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी दिले होते. त्यामधून आता महेश यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
१२ जून रोजी झालेल्या विमान अपघानानंतर बेपत्ता असलेल्या महेश जीरावाला यांची जळालेली अॅक्टिव्हा स्कूटर घटनास्थळाजवळ सापडली होती. त्यामुळे महेश हेसुद्धा या विमान अपघातात सापडले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनदेखील घटनास्थळाजवळच सापडलं होतं. त्यामुळे या अपघातात महेश यांचं काही तरी बरंवाईट झालं असावं, अशी शंका त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होती, अखेरीस डीएनए चाचणीमधून त्यांना वाटत असलेली भीती खरी ठरली. मात्र तरीही महेश यांचे कुटुंबीय त्यांचा मृत्यू झाला आहे, हे मान्य करण्यास तयार नव्हते. अखेरीस पोलिसांनी अॅक्टिव्हाचा चेसिस क्रमांक आणि डीएनए अहवालासह सर्व माहिती दिली. तेव्हा कुटुंबीयांना शोक अनावर झाला.
दरम्यान, १२ जून रोजी दुपारी १.३९ वाजता एअर इंडियाचे विमान पडले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान लंडनला जाण्यासाठी झेपावले. पण, काही क्षणातच जमिनीवर कोसळले होते. यात वैद्यकीय शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. या विमानातील केवळ एकच प्रवाशी वाचला.