Ahmedabad Plane Crash Case Update:अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकाने आपला प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर केला आहे. ही माहिती वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अहवालात तपासकर्ते कोणत्या निष्कर्षावर पोहोचले आहेत, हे अद्याप समोर आले नाही.
घटना कशी घडली?१२ जून २०२५ रोजी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान मेघनानगर परिसरातील एका वसतिगृह संकुलात कोसळले. या दुःखद अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक स्थानिकांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातात चमत्कारिकरित्या एक प्रवासी बचावला.
ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळले?नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अपघातस्थळावरुन ताब्यात घेतलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेत त्याच्या मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की, मानवी चुकीमुळे झाला, हे स्पष्ट करण्यासाठी आता तपास संस्था डेटाचे विश्लेषण करत आहेत.