सात दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू, अस्थी विसर्जिनासाठी भारतात आले; विमान अपघातात मृत्यू, चिमुरड्या झाल्या पोरक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:58 IST2025-06-13T14:53:35+5:302025-06-13T14:58:07+5:30

अहमदाबाद येथील विमान अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून त्यामध्ये पटोलिया यांचाही समावेश आहे

Ahmedabad Plane Crash Arjunbhai Manubhai Patolia who came to India to fulfill his wife last wish passes away | सात दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू, अस्थी विसर्जिनासाठी भारतात आले; विमान अपघातात मृत्यू, चिमुरड्या झाल्या पोरक्या

सात दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू, अस्थी विसर्जिनासाठी भारतात आले; विमान अपघातात मृत्यू, चिमुरड्या झाल्या पोरक्या

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जगभरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह २५ निवासी डॉक्टरांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघाताच्या घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. तर या अपघाताने काही कुटुंबांना असे आघात दिले आहेत जे कधीही भरुन निघणार नाहीत. यामध्ये पटोलिया यांचाही समावेश आहे. अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुनभाई मनुभाई पटोलिया यांचे या अपघातात निधन झाले. पटोलिया त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते.

अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारतीबेन यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झालं होतं. त्यांच्या पत्नीची इच्छा होती की त्यांच्या अस्थी फुलांच्या कलशासह अमरेली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातील तलाव आणि नदीत विसर्जित केल्या जाव्यात. अर्जुन त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी अमरेलीतील त्यांच्या गावी त्यांच्या नातेवाईकांसह अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले. मात्र ते लंडनला परत जाऊ शकले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे अर्जुन यांना दोन मुली आहेत. ते त्यांना तिथेच सोडून भारतात आले होते. मात्र आता त्यांच्या डोक्यावरील आई वडीलांचे छत्र हरवलं आहे.

लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १७१ विमानाच्या अपघातात अर्जुन यांचा मृत्यू झाला. विमान अपघाताची बातमी मिळताच अर्जुन यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या घरात शोककळा पसरली. अर्जुन आपल्या मुलांना लंडनमध्ये सोडून वाडिया येथे आले. दोन्ही मुलींनी त्यांच्या आई आणि वडिलांना गमावले. अर्जुन यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्यांची आई सुरतमध्ये राहत होती.

दरम्यान, अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २३ वरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान लगेचच कोसलळे. विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या मेसच्या इमारतीशी आदळले आणि पुढच्या काही सेकंदातच स्फोट झाला. ही धडक इतकी जोरदार होती की इमारतीच्या मध्यभागी बांधलेली पाण्याची टाकी दुसऱ्या बाजूला पोहोचली. यानंतर, विमानाचा मागील भाग या इमारतीत अडकला, तर उर्वरित भाग पुढे पडला. त्यानंतर झालेल्या स्फोटात विमानाचे तुकडे झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लागली. या अपघातात २५ निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला. 
 

Web Title: Ahmedabad Plane Crash Arjunbhai Manubhai Patolia who came to India to fulfill his wife last wish passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.