गुजरातमधीलअहमदाबाद येथे एका विद्यार्थ्याच्या झालेल्या हत्येवरून वातावरण तापले आहे. अहमदाबादमधील मणिनगर येथील एका शाळेत दहावीत शिकणाऱ्या नयन संथानी नावाच्या विद्यार्थ्याची मंगळवारी चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, या हत्येप्रकरणी शाळा प्रशासनावर हलगर्जीपणा आणि पुरावे लपवल्याचे आरोप करण्यात येत आहेत. याविरोधात आता लोक रस्यावर उतरले असून, एनएसयूआयने शाळेला कुलूप ठोकून आपला विरोध नोंदवला आहे.
अहमदाबादमधील मणिनगर येथील सेवन्थ डे एडवेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या नयन संतानी या विद्यार्थ्यावर मंगळवारी शाळेच्या आवारातच आठवीतील एका विद्यार्थ्याने धारदार कटरने हल्ला केला होता. या हल्ल्यात नयन हा गंभीर जखमी होऊन तिथेच पडला होता. तो बराच वेळ तडफडत होता. मात्र शाळेतील कर्मचारी वर्ग आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला त्वरित रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाही फोन केला नाही.
गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ३० मिनिटे लागली होती. ही बाब त्याच्या मृत्यूचं कारण ठरली. धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी सांडलेलं रक्त धुवून टाकण्यासाठी शाळा प्रशासनाने टँकर मागवला होता. त्यामुळे शाळा प्रशासनाने पुरावे लपवल्याचा आरोप मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, बुधवारी मृत विद्यार्थ्याचे कुटुंबीय आणि संतप्त जमावाने शाळेत घुसून मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती. तसेच मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाणही केली होती. पोलिसांनी खूप प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती निवळली होती. दरम्यान, एनएसयूआयचे कार्यकर्ते आज सकाळी ११.३० वाजता मृत विद्यार्थ्यासाठी न्यायाची मागणी करत शाळेत पोहोचले. तसेच त्यांनी निषेध नोंदवत शाळेला कुलूप ठोकले होते. त्यानंतर एनएसयूआयकडून न्यायाची मागणी करण आंदोलनही करण्यात आले.