वर्गात मोठ्याने ओरडली, नंतर शांतपणे चाव्या घेऊन निघाली अन्...; १० वीच्या विद्यार्थिनीचे हादरवणारं कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:08 IST2025-07-25T17:04:23+5:302025-07-25T17:08:11+5:30
गुजरातमध्ये एका शाळेतील विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन स्वतःला संपवलं.

वर्गात मोठ्याने ओरडली, नंतर शांतपणे चाव्या घेऊन निघाली अन्...; १० वीच्या विद्यार्थिनीचे हादरवणारं कृत्य
Gujarat Student Death: गुजरातच्या अहमदाबादमधील एका शाळेतून भयानक घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या नवरंगपुरा इथल्या एका शाळेतील १६ वर्षाच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मैत्रिणींनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच तिने उडी मारली. चौथ्या मजल्यावरुन उडी मारल्याने मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
अहमदाबाद शहरातील सोम ललित शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून जात असतानाच खाली उडी मारली ज्यामुळे तिच्या पायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मात्र, विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विद्यार्थिनीची स्कूल बॅग किंवा घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचीच चर्चा संपूर्ण शाळेत सुरु आहे.
पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त केला असून तिचे वर्गमैत्रिणी, मित्र आणि शाळेतील शिक्षकांचीही चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर शुक्रवारी शाळा प्रशासनाने सकाळपासून संपूर्ण घटनेपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज नवरंगपुरा पोलिसांना दिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थीनी वर्गातून बाहेर पडते आणि लॉबीच्या रेलिंगवरून खाली उडी मारताना दिसली.
शाळेने दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी एका महिन्याच्या रजेनंतर १५ दिवसांपूर्वीच शाळेत आली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचे वैद्यकीय प्रमाणपत्रही शाळेत सादर केले होते. मुलीच्या वडिलांनी गुरुवारी सकाळी तिला शाळेत सोडले होते. वर्गात थोडा वेळ बसल्यानंतर ती मुलगी अचानक ओरडू लागली. शिक्षकांनीही तिला शांत केले. तिच्या काही मैत्रिणींनी सांगितले की ती सकाळपासूनच कशामुळे तरी अस्वस्थ होती. मात्र, तिने त्याचे कारण कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर दुपारी १२:३० च्या सुमारास जेवणाच्या वेळी हा सगळा प्रकार घडला. ती विद्यार्थिनी शांतपणे चाव्यांचा गुच्छा घेऊन चालत वर्गाबाहेर गेली आणि त्यानंतर तिने खाली उडी मारली.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक लहान भाऊ आहे. तिच्या वडिलांचे नारणपुरा परिसरात दुकान आहे. कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि घरात कोणत्याही मुद्द्यावरून कोणताही तणाव नव्हता. माझी मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. त्यानंतर शाळेतून मला १२.४५ वाजता फोन करुन सांगितलं की मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असं मुलीच्या वडिलांनी सांगितले.