विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:28 IST2025-07-23T15:13:43+5:302025-07-23T15:28:25+5:30
अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमध्ये चुकीच्या व्यक्तींचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवरुन सोडलं. १२ जून रोजी, एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमानान अहमदाबादहून गॅटविक लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका इमारतीवर कोसळले. या अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला, ज्यात विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. मृतांमध्ये परदेशातील नागरिकांचाही समावेश होता. या विमान दुर्घटनेला महिना उलटला असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडिया अपघातातील मृतांचे चुकीचे मृतदेह ब्रिटनमधील कुटुंबांना पोहोचले आहेत.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. यापैकी २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. विमान कोसळ्यानंतर मोठ्या प्रमाणात इंधनाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांचा जागीच कोळसा झाला. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले होते. मात्र आता ब्रिटनमधील दोन कुटुंबांना चुकीचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघातानंतर, मृतदेहांची ओळख पटवून कुटुंबियांना देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. पण एक मोठी चूक समोर आली आहे. ब्रिटिश माध्यमांनुसार, ब्रिटनमधील दोन कुटुंबांना विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांऐवजी चुकीच्या मृतदेहांचे अवयव पाठवण्यात आले आहेत.
हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि चौकशीची मागणी केली.
इनर वेस्ट लंडनच्या कोरोनर डॉ. फियोना विल्कॉक्स यांनी डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही चूक उघडकीस आली. अपघातानंतर, ब्रिटिश नागरिकांचे कुटुंबिय भारतात आले होते आणि त्यांनी मृतदेह मिळविण्यासाठी डीएनएचे नमुने दिले. त्यानंतर, भारतातून डीएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवण्यात आले. मा लंडनमध्ये पुन्हा एकदा डीएनए चाचणी केल्यानंतर चूक पकडली गेली.
या प्रकारामुळे इतर मृतदेहांची ओळख पटवण्यात चुका झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक मृतदेहांवर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले आहेत. ब्रिटनमधील कुटुंबियांचे म्हणणे आहे की अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह शवपेटी आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये देण्यात आले होते. मृतदेहांच्या कंटेनरवर लेबल्स चिकटवले होते, ज्यावर नावे लिहिलेली होती. मृतदेह जास्त जळाल्यामुळे, नातेवाईकांना कंटेनर किंवा शवपेट्या उघडण्यास मनाई केली होती.
दरम्यान, ब्रिटनमधील पीडित कुटुंबांनी त्यांच्या खासदारांशी, परराष्ट्र कार्यालयाशी, पंतप्रधानांशी आणि परराष्ट्र सचिवांच्या कार्यालयांशी संपर्क साधून एअर इंडियाला उत्तर मागितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान केयर स्टारमर या प्रकरणी थेट चर्चा करतील असं म्हटलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे ब्रिटिश कुटुंबांमध्ये नाराजी आहे.