Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:13 IST2025-06-13T07:17:37+5:302025-06-13T10:13:22+5:30

Ahmedabad Air India Flight AI171 Crash :अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Who is responsible for this accident? Boeing's fault or...? | Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 

Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 

अहमदाबाद - अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली. यात शिकाऊ डॉक्टरांसह २४ जण देखील मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. अनेक इमारती, वाहनांना आग लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानातील वैमानिकाने ‘मेडे’ असा संदेश पाठविला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर किंवा काही संकटात सापडले असेल तर हा संदेश दिला जातो. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसून येते. या विमानातील २४२ जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. 

विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
- हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ कोसळले. या दुर्घटनेत किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्युमुखी पडली असून, ६० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.   
-दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की, त्यामुळे एका पाच मजली इमारतही खाक झाली.  
- भारतातील २०२० नंतरची ही दुसरी सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे. पूर्वी कोझिकोड (केरळ) येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान ओल्या धावपट्टीवरून घसरून दोन तुकडे झाले होते. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअर लाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरतानाच कोसळले होते. त्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. 

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणार
अहमदाबाद : गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात येणार आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे आरोग्य खात्याचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले.  

विमानात कोणत्या देशाचे  किती नागरिक?
अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या विमानात १२ क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एक नागरिक यांचा समावेश होता. हे विमान गुरुवारी सायंकाळी ६.२५ वाजता लंडनमध्ये लँड करणे अपेक्षित होते.   

मृतांच्या वारसांना टाटा समूह देणार १ कोटी रुपये
नवी दिल्ली : अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या परिवारास १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा टाटा समूहाने गुरुवारी केली. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी  ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, प्रत्येक मृताच्या वारसास टाटा समूह १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देईल. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च समूह करेल. बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य केले जाईल.

Web Title: Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Who is responsible for this accident? Boeing's fault or...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.