खेळता खेळता दीड वर्षाच्या मुलाने गिळला प्लास्टिकचा 'हल्क'; डॉक्टरांसमोर मोठं आव्हान, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:22 IST2026-02-03T16:21:23+5:302026-02-03T16:22:01+5:30

वंश नावाच्या दीड वर्षाच्या एका लहान मुलाने खेळता खेळता 'हल्क' नावाचं प्लास्टिकचं खेळणं गिळलं.

ahmedabad 1 year child swallowed plastic toy character hulk playing complex operation saved | खेळता खेळता दीड वर्षाच्या मुलाने गिळला प्लास्टिकचा 'हल्क'; डॉक्टरांसमोर मोठं आव्हान, अखेर...

फोटो - आजतक

गुजरातच्या अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंश नावाच्या दीड वर्षाच्या एका लहान मुलाने खेळता खेळता 'हल्क' नावाचं प्लास्टिकचं खेळणं गिळलं. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेथे एक्स-रे केल्यानंतर हे खेळणं मुलाच्या पोटात असल्याचं दिसून आलं. अखेर डॉक्टरांना सर्जरी करून हे खेळणं बाहेर काढावं लागलं.

१८ जानेवारी रोजी हा चिमुकला घरात खेळत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसू लागली आणि काही वेळाने त्याला उलट्या होऊ लागल्या. हे पाहून त्याची आई भाविकाबेन यांना संशय आला. त्यांनी मुलाची सर्व खेळणी तपासली असता, त्यातील एक खेळणं गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मुलाला विचारलं असता त्याने खेळणं गिळल्याचं सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी वेळ न घालवता त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. एक्स-रे रिपोर्टमध्ये मुलाच्या पोटात खेळणं पाहून डॉक्टरांना धक्का बसला.

डॉक्टरांसमोर होतं मोठं आव्हान 

सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी या कठीण सर्जरीबद्दल माहिती देताना सांगितलं की, "मुलाच्या पोटात अडकलेलं खेळणं हा कोणताही छोटा तुकडा नव्हता तर हात, पाय आणि डोकं असलेलं खेळणं होतं. अन्ननळी आणि पोट यांच्यामध्ये एक नैसर्गिक 'वॉल्व्ह' असतो. इतकं मोठं खेळणं त्या वॉल्व्हमधून बाहेर काढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं."

"जेव्हा आम्ही एंडोस्कोप सारख्या नाजूक उपकरणाने खेळणं पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोटात हवा असल्याने ते सतत घसरत होतं. जर आम्ही ते हात किंवा पायाकडून ओढले असते, तर ते वॉल्व्हमध्ये अडकून कायमचं नुकसान होण्याची भीती होती. अखेर ४५ मिनिटांच्या परिश्रमानंतर अत्यंत संयम राखून आम्ही त्या खेळण्याचं डोकं पकडलं आणि सुरक्षितपणे वॉल्व्हमधून बाहेर काढलं. जर हे खेळणं आतड्यात गेलं असतं, तर आतडं फाटण्याचा धोका होता आणि मोठी सर्जरी करावी लागली असती."

डॉक्टरांचं पालकांना आवाहन 

ज्या वेळी ही आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सुरू होती. मात्र प्रकरणाचं गांभीर्य ओळखून डॉ. राकेश जोशी यांनी स्वतः डॉ. श्वेता आणि टीमसह हे यशस्वी ऑपरेशन केलं. दीड वर्षाचा वंश आता पूर्णपणे बरा आहे. या घटनेनंतर डॉ. जोशी यांनी पालकांना आवाहन केलं आहे की, लहान मुलांना अशा लहान खेळण्यांसोबत कधीही एकटं सोडू नका आणि मुलं खेळत असताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा.
 

Web Title : डेढ़ साल के बच्चे ने निगला खिलौना हल्क; डॉक्टरों ने किया जोखिम भरा ऑपरेशन

Web Summary : अहमदाबाद में, डेढ़ साल के एक बच्चे ने प्लास्टिक का हल्क खिलौना निगल लिया। सिविल अस्पताल के डॉक्टरों ने 45 मिनट के तनावपूर्ण ऑपरेशन के बाद इसे सफलतापूर्वक निकाल दिया। डॉक्टरों ने माता-पिता को छोटे खिलौनों के साथ बच्चों की निगरानी करने की सलाह दी है।

Web Title : Toddler Swallows Toy Hulk; Doctors Perform Risky Surgery

Web Summary : In Ahmedabad, a one-and-a-half-year-old boy swallowed a plastic Hulk toy. Doctors at the Civil Hospital successfully removed it via surgery after a tense 45 minutes. Doctors advise parents to supervise children closely with small toys to prevent such incidents.