agriculture bills passed in rajya sabha amid opposition protest | माईकची मोडतोड, प्रचंड घोषणाबाजी; राज्यसभेत कृषी विधेयकं संमत होताना मोठा गोंधळ

माईकची मोडतोड, प्रचंड घोषणाबाजी; राज्यसभेत कृषी विधेयकं संमत होताना मोठा गोंधळ

नवी दिल्ली: विरोधकांच्या गोंधळात शेतीशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली आहे. दोन्ही विधेयकं आवाजी मतदानानं संमत झाली. विधेयकांना मंजुरी मिळत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी नियमांची पुस्तिका फाडली आणि माईकही तोडला.
सदनाची कार्यवाही वाढवण्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. राज्यसभेचा वेळ वाढवला जाऊ नये, अशी मागणी काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांनी उपसभापतींकडे केली. मंत्र्यांनी विधेयकांवर उद्या उत्तरं द्यावी. बहुतांश सदस्यांची हीच मागणी आहे. राज्यसभेची वेळही १ वाजेपर्यंतच आहे, असं आझाद म्हणाले. या गोंधळातच कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विधेयकांवर उत्तरं दिली. यावेळी गोंधळी खासदारांनी त्यांच्या आसनांसमोरील माईकची मोडतोड केली.
काय म्हणाले कृषीमंत्री?
शेतकऱ्यांच्या शेतमालाला दिल्या जाणाऱ्या हमीभावाचा आणि या विधेयकांचा संबंध नाही. हमीभाव देऊनच शेतमालाची खरेदी होत आहे आणि पुढेही होत राहील. याबद्दल कोणालाही शंका नसावी, असं तोमर म्हणाले. सरकारकडून मांडण्यात आलेली दोन्ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारक ठरणार आहेत. यामुळे आपला शेतमाल कोणत्याही ठिकाणी नेऊन त्यांना हव्या असलेल्या किमतीला विकता येईल, असं तोमर यांनी म्हटलं. या विधेयकांबद्दल अफवा पसरवण्यात आल्या. मात्र हमीभाव कायम राहील, हे पंतप्रधानांनीदेखील स्पष्ट केलं आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस, आपची जोरदार टीका
काँग्रेसनं विधेयकांना आक्रमकपणे विरोध केला. 'ही विधेयकं म्हणजे पंजाब आणि हरयाणातल्या शेतकऱ्यांच्या आत्म्यावर हल्ला आहे. या विधेयकांना मंजुरी देणं म्हणजे शेतकऱ्यांच्या डेथ वॉरंटवर स्वाक्षरी करणाऱ्यासारखं आहे. शेतकरी एपीएमसी आणि एमएसपीमधील बदलांच्या विरोधात आहे,' अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रताप सिंग बाजवांनी विधेयकांवर जोरदार टीका केली. मोदी सरकारनं मंजूर केलेली विधेयकं म्हणजे काळे कायदे असल्याचं आपचे खासदार संजय सिंह म्हणाले. शेतकऱ्यांना धनदांडग्यांच्या हाती सोपवण्याचं काम सरकार करतंय. आम आदमी पक्षाचा याला विरोध आहे, असं सिंह म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: agriculture bills passed in rajya sabha amid opposition protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.