BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:05 IST2025-12-21T11:04:29+5:302025-12-21T11:05:15+5:30
Agniveer BSF: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
Agniveer BSF: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (BSF) मधील काँस्टेबल भरती नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करत, माजी अग्निवीरांसाठी 50 टक्के आरक्षण आणि वयोमर्यादेत विशेष सवलत जाहीर केली आहे. यासंदर्भातील सुधारित अधिसूचनादेखील केंद्राने जारी केली असून, पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.
भरती नियमांमध्ये महत्त्वाचा बदल
नवीन अधिसूचनेनुसार, BSF मध्ये थेट भरतीद्वारे होणाऱ्या काँस्टेबल पदांच्या प्रत्येक भरती वर्षात 50 टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. याशिवाय, 10 टक्के आरक्षण माजी सैनिकांसाठी, 3 टक्के जागा कॉम्बॅटाइज्ड काँस्टेबल (ट्रेड्समन) समायोजनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय अग्निपथ योजनेतून सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांना केंद्रस्थानी सुरक्षा दलांमध्ये करिअरची संधी देणारा ठरणार आहे.
The Central Government makes rules further to amend the Border Security Force, General Duty Cadre (Non-Gazetted) Recruitment Rules, 2015 by exercising the powers conferred by clauses (b) and (c) of sub-section (2) of section 141 of the Border Security Force Act,1968 (47 of 1968).…
— ANI (@ANI) December 21, 2025
वयोमर्यादेत मोठी सवलत
BSF काँस्टेबल (GD) पदासाठी:
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 23 वर्षे
वयोमर्यादेची गणना संबंधित SSC किंवा नोडल फोर्सच्या अधिसूचनेनुसार केली जाईल.
माजी अग्निवीरांसाठी विशेष सवलत:
पहिल्या बॅचच्या माजी अग्निवीरांना: कमाल 5 वर्षांची सूट
इतर माजी अग्निवीरांना: 3 वर्षांपर्यंत सूट
यामुळे मोठ्या संख्येने माजी अग्निवीरांना BSF मध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
कोण आहेत अग्निवीर ?
अग्निवीर हे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणारे जवान असतात. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली असून, भारतीय सशस्त्र दल अधिक तरुण, सक्षम आणि आधुनिक बनवणे हा तिचा उद्देश आहे. अग्निपथ योजनेतून तरुणांना भारतीय सेना, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलात 4 वर्षांच्या अल्पकालीन सेवेसाठी भरती केले जाते. या कालावधीत सेवा करणाऱ्यांना ‘अग्निवीर’ असे संबोधले जाते.
सेवा कालावधी आणि भवितव्य
चार वर्षांनंतर 25 टक्के अग्निवीरांना कायम सेवेत (रेग्युलर) सामावून घेतले जाते, तर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना सन्मानपूर्वक सेवा निवृत्त केले जाते. अग्निवीरांना मासिक वेतन पहिल्या वर्षासाठी ₹30,000, दुसऱ्या वर्षासाठी ₹33,000, तिसऱ्या वर्षासाठी ₹36,500 आणि चौथ्या वर्षासाठी ₹40,000 दिले जाते.
पात्रता निकष
साधारणतः 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण या योजनेत सामील होऊ शकतात. याची शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी (पदानुसार) असून, शारीरिक व वैद्यकीय चाचणी अनिवार्य आहे. 4 वर्षांनंतर सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना CAPF, BSF, CRPF, CISF मध्ये आरक्षण दिले जाते. याशिवाय, राज्य पोलीस भरतीत प्राधान्य, खासगी क्षेत्रात नोकरीसाठी सहाय्य दिले जाते.