व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब, मुख्य आरोपीचं घर जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 09:02 IST2023-07-21T09:02:18+5:302023-07-21T09:02:39+5:30
Manipur Violence: हिंसक आंदोलनामुळे जळत असलेल्या मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. त्यातच दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब, मुख्य आरोपीचं घर जाळलं
गेल्या तीन महिन्यांपासून हिंसक आंदोलनामुळे जळत असलेल्या मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. त्यातच दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तणाव वाढला असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर जमावाने जाळून टाकलं आहे. हि घटना मणिपूरमधील चेकमाई परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अचानक आलेल्या जमावाने मुख्य आरोपीचं घर पेटवून दिलं. या घटनेचा व्हिडीओसुद्धा आता व्हायरल होत आहे. मणिपूरमध्ये आरक्षणावरून हिंसेचा आगडोंब भडकल्यानंतर दोन महिलांना जमावाने नग्न करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुरुवारी अटक केली होती.
मणिपूरमध्ये तीन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले.
त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.