पाटणा : मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक असलेले काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १७ ऑगस्ट रोजी बिहारमध्ये सुरू केलेल्या ‘मतदार अधिकार यात्रेचा’ सोमवारी पाटण्यात समारोप झाला. ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. ज्या शक्तींनी महात्मा गांधी यांची हत्या केली त्याच आता संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता रेशन कार्ड आणि जमिनीही हिसकावून उद्योगपतींना दिल्या जातील, असे राहुल गांधी म्हणाले.
दावे दाखल करता येणारबिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतील दावे, आक्षेप आणि दुरुस्त्या १ सप्टेंबरनंतरही दाखल करता येतील, परंतु मतदार यादी अंतिम झाल्यानंतरच त्यांचा विचार केला जाईल, असे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
भाजपवाले नितीशकुमार यांना कचऱ्यात टाकतील यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार सध्या भाजप-संघाच्या झोळीत असल्याचे सांगून हे लोक त्यांना कचऱ्यात टाकल्यासारखे बाजूला करतील, असा दावा केला.
मतदारांचा हा अपमान : रविशंकर प्रसादराहुल गांधी करीत असलेले दावे म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले. रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचा ‘ॲटम बॉम्ब’ कुचकामी ठरला असल्याचे सांगून ‘हायड्रोजन बॉम्ब’च्या दाव्याचीही खिल्ली उडवली.