सीमानंतर आता आणखी एक पाकिस्तानी तरुणी चर्चेत, बनली राजस्थानची 'ऑनलाईन सून'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 15:52 IST2023-08-05T15:51:25+5:302023-08-05T15:52:42+5:30
पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहेत. आता आणखी एका तरुणीची सध्या चर्चा सुरूये.

सीमानंतर आता आणखी एक पाकिस्तानी तरुणी चर्चेत, बनली राजस्थानची 'ऑनलाईन सून'
पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहेत. दोघांच्या या स्टोरीमुळे सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा आहे. दरम्यान, आता आणखी एका पाकिस्तानी तरुणीची चर्चा सुरू झाली आहे. या तरुणीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोधपूरमधील तरुणाशी निकाह केला. जोधपूरचा रहिवासी असलेला मोहम्मद अरबाज आणि पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी असलेल्या अमिना यांनी ऑनलाइन निकाह केला. बुधवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे त्यांचा निकाह पार पडला.
जोधपूर येथे राहणारे कॉन्ट्रॅक्टर मोहम्मद अफजल यांचा धाकटा मुलगा अरबाज यानं अमीना या पाकिस्तानी मुलीशी निकाह केला. हा खास ऑनलाइन निकाह बुधवारी पार पडला.
... म्हणून ऑनलाइन केला निकाह
आधी हा सोहळा कराचीमध्ये पार पडणार होता. परंतु व्हिसा न मिळाल्याने त्यांनी ऑनलाइन निकाह करण्याचा निर्णय घेतला, असं सांगितलं जातंय. या अनोख्या सोहळ्यात मोहम्मद अरबाज आणि अमीना यांच्या कुटुंबीयांनी निकाहचे सर्व विधी ऑनलाइन पार पाडले. दोन्ही कुटुंबंही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडली गेली. कार्यक्रमस्थळी लॅपटॉपसह दोन मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात आले होते.
जोधपूरला येणार वधू
वधू लवकरच पाकिस्तानातून जोधपूरला येणार असल्याची माहिती वराचे वडील मोहम्मद अफजल यांनी दिली. आमचेही तिथे नातेवाईकही आहेत. आता आम्ही व्हिसाची तयारी करू. ऑनलाइन विवाह आमच्यासारख्या सामान्य कुटुंबांसाठी सोयीस्कर आहे. त्यासाठी खर्चही कमी येतो. जर आपण निकाहनामासह व्हिसासाठी अर्ज केला तर तो सहज उपलब्ध होईल, असंही ते म्हणाले.