परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:30 IST2025-07-10T12:29:14+5:302025-07-10T12:30:29+5:30
Shashi Tharoor on Indira Gandhi Emergency: शशी थरुर हे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी १९७५ च्या इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीवर एक लेख लिहिला आहे. आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले...
पाकिस्तान विरोधातील ऑपरेशन सिंदूरवरून जगभरात डंका वाजवून येताच काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काँग्रेसवरचइंदिरा गांधींच्या आणीबाणीचा बॉम्ब फोडला आहे. थरुर यांनी आणीबाणीमध्ये कशाप्रकारे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते, तेव्हा जग कसे 'मानवी हक्कांच्या उल्लंघना'बद्दल अनभिज्ञ राहिले हे देखील सांगितले आहे. एकप्रकारे थरूर यांनी काँग्रेसवरच आणीबाणीवरून जबर टीका केली आहे.
शशी थरुर हे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी १९७५ च्या इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीवर एक लेख लिहिला आहे. आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणी हा केवळ भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय मानला जाऊ नये, तर त्याचे धडे पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत इंदिरा आणि संजय गांधी यांच्या या काळातील कामांवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे.
एका मल्याळम वृत्तपत्रात थरुर यांचा हा लेख प्रसिद्ध झाला आहे. शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी केलेले प्रयत्न क्रूरतेत रूपांतरित झाले जे समर्थनीय ठरू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी सक्तीची नसबंदी मोहीम सुरू केली. हे आणीबाणीचे सर्वात चुकीचे उदाहरण आहे. पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीतून हे दिसून आले की, सुरुवातीला हळूहळू, चांगल्या किंवा वाईट हेतूंच्या नावाखाली लहान लहान वाटणाऱ्या गोष्टींचे स्वातंत्र्य कसे हिरावून घेतले जाते. म्हणूनच हा एक मोठा इशारा आहे, लोकशाहीच्या समर्थकांनी नेहमीच जागरूक राहिले पाहिजे, असे थरूर म्हणाले.
देशासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत, केवळ आणीबाणीच अंतर्गत अव्यवस्था आणि बाह्य धोक्यांना तोंड देऊ शकते आणि अराजक देशात शिस्त आणि कार्यक्षमता आणू शकते, असा आग्रह तेव्हा इंदिरा गांधींनी धरला होता. जून १९७५ ते मार्च १९७७ पर्यंत जवळजवळ दोन वर्षे चाललेल्या आणीबाणीच्या काळात, नागरी स्वातंत्र्य निलंबित करण्यात आले आणि विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. शिस्त आणि सुव्यवस्थेची इच्छा अनेकदा अव्यक्त क्रूरतेत रूपांतरित होते, संजय गांधींनी राबविलेली नसबंदी हे क्रूर उदाहरण आहे. गरीब आणि ग्रामीण भागात केंद्रित होती. तिथे मनमानी लक्ष्ये साध्य करण्यासाठी जबरदस्ती आणि हिंसाचाराचा वापर केला गेला होता, असा आरोप थरूर यांनी केला आहे.
दिल्लीसारख्या शहरी भागात झोपडपट्ट्या निर्दयीपणे पाडल्यामुळे हजारो लोक बेघर झाले आणि त्यांच्या कल्याणाची त्यांना काहीच पर्वा नव्हती. आणीबाणीने लोकशाही संस्था मजबूत दिसत असल्या तरी किती नाजूक असू शकतात याचे एक ज्वलंत उदाहरण दिले. लोकशाहीला कमी लेखू नये. हा एक मौल्यवान वारसा आहे जो सतत जोपासला गेला पाहिजे आणि संरक्षित केला पाहिजे. आजचा भारत १९७५ चा भारत नाही. ते म्हणाले की आपण अधिक आत्मविश्वासू, अधिक विकसित आणि अनेक प्रकारे अधिक मजबूत लोकशाही आहोत. तरीही आणीबाणीचे धडे अजूनही चिंताजनकपणे प्रासंगिक आहेत, असे थरूर म्हणाले.