भिंद्रानवालेचे पोस्टर काढल्याने जम्मू पेटले
By Admin | Updated: June 4, 2015 23:33 IST2015-06-04T23:33:19+5:302015-06-04T23:33:19+5:30
दोन हजारावर शीख तरुण आणि पोलिसांदरम्यान गुरुवारी झालेल्या चकमकीत एक युवक ठार तर दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले.

भिंद्रानवालेचे पोस्टर काढल्याने जम्मू पेटले
जम्मू : जम्मूतील एका भागात खलिस्तानवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रानवालेचे पोस्टर काढून टाकल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणारे दोन हजारावर शीख तरुण आणि पोलिसांदरम्यान गुरुवारी झालेल्या चकमकीत एक युवक ठार तर दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले. या घटनेनंतर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान काही युवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जूनला भिंद्रानवालेचा मृत्युदिन आहे. त्यानिमित्त शीख समुदायातील एका संघटनेतर्फे ठिकठिकाणी त्याचे पोस्टर लावण्यात आले होते. प्रशासनाने हे पोस्टर्स हटविल्याने कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. लाठ्याकाठ्या आणि कृपाणधारी शेकडो युवक सतवारी आर.एस. पुरा मार्गावर जमा झाले आणि त्यांनी वाहतुकीची कोंडी केली. जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले.
या चकमकीत एक युवक ठार तर सहा जण जखमी झाले. दोन पोलीस दगडफेकीत जखमी झाले. परंतु युवकाचा मृत्यू गोळी लागून झाल्याचे इस्पितळातील सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलीस आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत काही शीख युवकांनी सतवारीमध्ये जम्मू-पठाणकोट महामार्गावर रास्तारोको करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचेही वृत्त आहे. जम्मूत भिंद्रानवालेचे पोस्टर्स लावण्याचा प्रकार प्रथमच घडतो आहे. (वृत्तसंस्था)