"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:36 IST2025-05-08T11:31:52+5:302025-05-08T11:36:45+5:30

ऑपरेशन सिंदूरनंतर शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीने कारवाई सुरुच ठेवण्याची मागणी केली आहे.

After Operation Sindoor wife of martyred naval officer Vinay Narwal has demanded that the operation continue | "थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी

"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी

Operation Sindoor:ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईचे देशभरातून कौतुक होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल ऑपरेशन सिंदूरची बातमी ऐकून भावुक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हिमांशीने सरकारला दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवू नये असे आवाहन केले.

करनाल येथील रहिवासी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या आई, वडील आणि पत्नीने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादाविरुद्ध भारताच्या कारवाईचे स्वागत केले. दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांच्यासमोर तीन गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर आता हिमांशी नरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैन्याचे आणि सरकारचे कौतुक केले. ही कारवाई इथेच थांबू नये तर दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत सुरू ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

"माझे पती सैन्य दलात होते आणि जेव्हा ते सामील झाले तेव्हा त्यांना देशात शांतता हवी होती. निष्पापांचे प्राण जाऊ नयेत, या देशात द्वेष आणि दहशत नसावी अशी त्यांची भावना होती. त्यांची हीच भावना या ऑपरेशन सिंदूरमध्ये आहे. सरकार दहशतवाद आणि द्वेष सहन करू शकत नाही," असं हिमांशी नरवाल यांनी म्हटलं.

"मी सरकारचे आभार मानते, पण मी एक विनंती करते की ही एवढीच कारवाई राहू नये. जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत कारवाई थांबवता कामा नये. ही तर फक्त सुरुवात आहे. मी ज्या वेदना सहन करत आहे त्या वेदना दुसऱ्या कोणालाही सहन करायला लागू नयेत असे मला वाटते. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना चोख प्रत्युत्तर देऊन, आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने हे सिद्ध केले की  आपल्याला जे सहन करावे लागले ते आता पाकिस्तानला करावे लागेल," असे हिमांशी म्हणाल्या.

"मी दहशतवाद्यांना विनंती केली होते की माझ्या लग्नाला फक्त सहा दिवस झाले आहेत, आमच्यावर दया करा. पण त्यांचे उत्तर होते मोदीजींना सांगा आणि आज मोदीजी आणि आपल्या सैन्याने उत्तर दिले आहे. आमचा विनय आणि इतर २६ निष्पाप नागरिकांचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही याबद्दल आम्हाला समाधान आहे," असेही नरवाल यांनी म्हटलं.
 

Web Title: After Operation Sindoor wife of martyred naval officer Vinay Narwal has demanded that the operation continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.