पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून काही भारतीय नागरिकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानी सैन्याच्या हवाई तळांवरही जोरदार हल्ले चढवले होते. मात्र या कारवाईदरम्यान, भारतीय हवाई दलाची काही विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये राफेलचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता ऑपरेश सिंदूरदरम्यान, राफेलबाबत पसरवण्यात आलेल्या अफवांमागे चीनचा हात असल्याची धक्कादायक माहिती फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून समोर आली आहे.
फ्रान्सच्या एका गोपनीय अहवालानुसार ऑपरेशन सिंदूरनंतर चीनने प्रोपेगेंडा मोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेच्या माध्यमातून राफेल विमानांच्या विक्रीला धक्का देण्याता प्रयत्न करण्यात आला. फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी मागणी करणाऱ्या देशांना चीनने त्यांच्या दुतावासांच्या माध्यमातून राफेलची खरेदी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार राफेलची विक्री घटवण्यासाठी चिनी दुतावासातील संरक्षण विषयाची संलग्न असलेल्यांनी भारताकडून वापरण्यात आलेली राफेल विमाने फारशी उपयुक्त नाहीत, असा तर्क दिला होता. तसेच इतर देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांशी शाकेल्या बैठकीमध्ये चीनमध्ये तयार झालेल्या हत्यारांचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना चीनचा घनिष्ठ मित्र असलेल्या पाकिस्तानने भारताच्या तीन राफेल विमानांना पाडल्याचा दावा केला होता. मात्र राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या दसाँ एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेला हा दावा फेटाळून लावला होता. एवढंच नाही तर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनीही एका मुलाखतीमधून पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला होता.
मे महिन्यामध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. तसेच या संघर्षामध्ये भारताकडून राफेल विमानांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, पाकिस्तान आणि पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनने राफेल विमानांना संरक्षण क्षेत्रात असलेली प्रतिष्ठा कमी करण्यासाठी एक मोहीम राबवली होती, असा दावा फ्रान्सकडून करण्यात आला आहे.