राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांनी सामान बांधायला केली सुरुवात; लवकरच व्हाईस प्रेसिडेंट हाऊस सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 22:56 IST2025-07-23T22:52:04+5:302025-07-23T22:56:10+5:30
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपती निवासस्थान रिकामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांनी सामान बांधायला केली सुरुवात; लवकरच व्हाईस प्रेसिडेंट हाऊस सोडणार
Jagdeep Dhankhar Resignation: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण देशाला धक्का दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी म्हटलं. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात आरोग्याच्या कारणांचा उल्लेख केला. त्यामुळे आता धनखड लवकरच उपराष्ट्रपती निवासस्थान रिकामे करतील. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड यांना सरकारी बंगला मिळण्याचा अधिकार आहे.
सोमवारी अचानक जगदीप धनखड राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. रात्री ९:०० वाजता त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना राजीनामा सादर केला. अर्ध्या तासानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन त्यांनी आपण राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्याच दिवसापासून त्यांनी उपराष्ट्रपती निवासस्थान रिकामे करण्यासाठी आपले सामान बांधण्यास सुरुवात केली. राष्ट्रपतींनी एक दिवसानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारला.
जगदीप धनखड गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संसद भवन संकुलाजवळील चर्च रोडवरील नव्याने बांधलेल्या व्हाईस प्रेसिडेंट एन्क्लेव्हमध्ये राहायला आले होते. १५ महिने व्हाईस प्रेसिडेंट एन्क्लेव्हमध्ये राहिल्यानंतर आता त्यांना व्हाईस प्रेसिडेंट हाऊस सोडावे लागेल. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांना लुटियन्स दिल्ली किंवा इतर कोणत्याही भागात टाइप ८ चा बंगला देण्यात येईल. टाइप-८ बंगले सहसा वरिष्ठ केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांना दिले जातात.
जगदीप धनखड काय म्हणाले?
"आरोग्याला प्राधान्य आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रापती पदाचा संविधानाच्या ६७ (अ) कलमानुसार तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. संसदेतील सर्व सदस्यांकडून जे प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला तो माझ्या आठवणीत राहिल. मी या महान लोकशाहीसाठी आभारी आहे, मला या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव आणि ज्ञान हे अत्यंत मौल्यवान होते. ही माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट आहे की मी भारताची अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि वेगाने होणारा विकास पाहिला आणि त्यामध्ये माझं योगदान दिलं," असं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
जगदीप धनखड यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते २०१९ पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. उपराष्ट्रपती असताना त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. या भूमिकेत त्यांनी सभागृहाचे कामकाज चालवले आणि अनेकदा कायदेविषयक प्रक्रियांवर त्यांचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात त्यांनी राजीनामा दिला. ऑगस्ट २०२२ मध्ये पदभार स्वीकारणारे ७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्यसभेत त्यांच्या निरोपाचे भाषण देखील झालं नाही.