माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र ते अद्यापही माध्यमांपासून दूर आहेत. ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत अथवा माध्यमांशी बोलत नाहीत. २१ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यापासून धनखड त्यांच्या अधिकृत निवासस्थानीच आहेत. त्यांच्याकडून फोन आणि मेसेजलाही प्रतिसाद नाही, यामुळे त्यांच्या ठावठिकाण्यासंदर्भात विविध प्रकारचे तर्क लावले जात आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करताना धनखड यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. "जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला? यामागे एक मोठी कहाणी आहे. ते का समोर येत नाहीयेत, याचीही एक कहाणी आहे. जी व्यक्ती राज्यसभेत एवढे बोलत होती, ती व्यक्ती अचानक पूर्णपणे गप्प झाली आहे."
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, "धनखड यांनी वैयक्तिक आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. असे म्हणत, या प्रकरणाला फार महत्त्व न देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
पत्नी वारंवार का जातेय राजस्थानला? -इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, धनखर यांच्या पत्नी सुदेश धनखर गेल्या एका महिन्यात किमान तीन वेळा राजस्थानला गेल्या आहेत. त्या दोनवेळा जयपूरला गेल्या. खरे तर, जयपूरमध्ये, धनखर कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर दोन व्यावसायिक इमारती बांधत आहे. महत्वाचे म्हणजे, राजस्थातात जाण्यासाठी त्यांनी खाजगी कारचा वापर केला. जयपूरमधील न्यू संगानेर रोडवर असलेल्या या जमिनीवर एका इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तर दुसऱ्या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. जवळच्या दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश नियमितपणे बांधकामाची पाहणी करण्यासाठी येतात.
माजी उपराष्ट्रपती खेळतात टेबल टेनिस अन् बघतात चित्रपट -धनखड यांच्या सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार, माजी उपराष्ट्रपतींचा दिवस योगाने सुरू होतो. ते सायंकाळच्या वेळी निवासस्थानाशेजारील मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेबल टेनिसही खेळतात. याशिवाय, ते 'द लिंकन लॉयर' आणि 'हाऊस ऑफ कार्ड्स' सारखे चित्रपटही बघित आहेत.