'त्या' तरुणीच्या तक्रारीमुळे ११ वर्षांनी गावात वीज पुरवठा पूर्ववत
By Admin | Updated: September 14, 2016 12:17 IST2016-09-14T12:17:21+5:302016-09-14T12:17:21+5:30
मागच्या ११ वर्षांपासून अंधार असलेल्या गावामध्ये एका तरुणीच्या तत्परतेमुळे आज पुन्हा वीजपुरवठा सुरु झाला आहे.

'त्या' तरुणीच्या तक्रारीमुळे ११ वर्षांनी गावात वीज पुरवठा पूर्ववत
ऑनलाइन लोकमत
ईटाह, दि. १४ - मागच्या ११ वर्षांपासून अंधार असलेल्या गावामध्ये एका तरुणीच्या तत्परतेमुळे आज पुन्हा वीजपुरवठा सुरु झाला आहे. दीप्ती मिश्रा या २३ वर्षीय तरुणीने पंतप्रधान कार्यालयात ऑनलाइन तक्रार नोंदवल्यामुळे वेगाने चक्रे फिरली आणि ११ वर्षांनी हे गाव प्रकाशाने उजळून निघाले.
उत्तरप्रदेशातील ईटाह जिल्ह्यातील बिधीया गावातील लोक आज दीप्तीचे भरभरुन कौतुक करत आहेत. बिधीया गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. जानेवारी २००५ मध्ये पहिल्यांदा या गावात वीज आली. पण जून महिन्यात झालेल्या वादाळामुळे या गावातील वीजेचे खांब, तारांचे नुकसान झाले.
गावक-यांनी ब्लॉक, वीज कार्यालय गाठून तक्रार नोंदवण्याचे प्रयत्न केले पण वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्याने अखेर गावक-यांनी हात टेकले पण दीप्तीने आपल्याबाजूने प्रयत्न सुरु ठेवले तिने अखेर पीएमओकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली.
त्यानंतर चक्रे वेगाने फिरली आणि ११ वर्षांनी या गावातील घरे वीजेने प्रकाशमान झाली. गावात कोणाकडेही अधिकृत वीज जोडणी नसल्याने इतक्या वर्षांचा विलंब लागला. तक्रार करणा-या तरुणीकडेही अधिकृत वीज जोडणी नाही असे उत्तरप्रदेश विद्युत विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.