नवी दिल्ली : ‘चायना गुरू’ राहुल गांधी व काँग्रेस पक्षाला भारतीय सशस्त्र दलांचा तिटकारा आहे. राहुल गांधी विदेशी शक्तींच्या रिमोट कंट्रोलखाली काम करत आहेत असा आरोप भाजपने सोमवारी केला. तर गलवान संघर्षानंतर प्रत्येक देशभक्त भारतीयाने चीनबाबत प्रश्न विचारले. परंतु, त्याबाबत केंद्र सरकारने दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, याआधी भारताची अर्थव्यवस्था मृत आहे, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानालाही राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. लष्कराचा अवमान करणे हीच आता काँग्रेसची ओळख बनली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, राहुल यांचा खोटारडेपणा उघड झाला. राहुल गांधी परकीय शक्तींच्या रिमोट कंट्रोलखाली काम करत आहेत.
‘त्रास देण्यासाठी राहुल गांधींविरोधात केली तक्रार’न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधाने करणे योग्य नव्हते. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संसद हे व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यावर गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी आपली विधाने अधिक योग्य पद्धतीने मांडू शकले असते. मात्र याप्रकरणी केवळ त्यांना त्रास देण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेसने विचारलेले प्रश्नगलवानमध्ये सैनिक शहीद झाल्यानंतर चार दिवसांत पंतप्रधानांनी “कोणीही आपल्या सीमेत घुसलेले नाही” असे का म्हटले. ही चीनला क्लीन चिट नव्हती ?
डेपसांग, डेमचोक आणि चुमार या भागांतील पेट्रोलिंग प्वाइंटवर जाण्यास भारतीय गस्ती पथकांना आता चीनच्या संमतीची गरज का भासत आहे?
२०२० मध्ये सुमारे १,००० चौरस किलोमीटर क्षेत्र, ज्यात डेपसांगमधील ९०० चौरस किलोमीटर भाग आहे, तो चीनच्या ताब्यात गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, ते खरे नाही का?लेहचे पोलीस अधीक्षक यांनी अहवालात ६५ पैकी २६ पेट्रोलिंग प्वाइंटवर भारताने नियंत्रण गमावल्याचे नमूद केले होते, हे सत्य नाही का?
चीनकडून होणारी आयात झपाट्याने वाढून व्यापारी तोटा विक्रमी ९९.२ अब्ज डॉलरवर पोहोचला, हे खरं नाही का?चीन पाकला ऑपरेशन सिंदूरवेळी “लाइव्ह इनपुट” देतो, अशा देशाशी सरकार संबंध “सामान्य” का करतेय?