डॉग बाबूनंतर आता 'कॅट कुमार'ही रहिवासी; वडील 'कॅटी बॉस' तर आईचे नाव 'कटिया देवी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:54 IST2025-08-12T10:53:48+5:302025-08-12T10:54:30+5:30
या अजब प्रकाराबद्दल अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

डॉग बाबूनंतर आता 'कॅट कुमार'ही रहिवासी; वडील 'कॅटी बॉस' तर आईचे नाव 'कटिया देवी'
विभाष झा
पाटणा :बिहारमध्ये डॉग बाबूनंतर आता नावाने रहिवासी प्रमाणपत्र मागण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या अजब प्रकाराबद्दल अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमध्ये काय चालले आहे काही कळायला मार्ग नाही. अलीकडेच रहिवासी प्रमाणपत्राच्या नावावर डॉग बाबू या नावाने अधिकृत रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्यात आले होते. यात वडिलांचे नाव कुत्ता बाबू, तर आईचे नाव कुतियादेवी असे नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात सखोल चौकशी केली जात असतानाच नवा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी कधी डोनाल्ड ट्रम्प, तर कधी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे छायाचित्र लावून वारंवार अर्ज केले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. आता तर रोहतास जिल्ह्यातील अजबच प्रकार समोर आला आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू
एका मांजरीचे छायाचित्र वापरून कॅट कुमार नावाने रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आला आहे. या अर्जात वडिलांचे नाव कॅटी बॉस, तर आईचे नाव कटिया देवी असे लिहिले आहे. प्रशासनिक पातळीवर याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रोहतासच्या जिल्हाधिकारी उदिता सिंह यांच्या निर्देशावरून नासरीगंजचा महसूल कर्मचारी कौशल पटेल याने नासरीगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
असा आहे अर्ज २९ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करण्यात आला असून, यात अर्जदाराचे नाव कॅट कुमार लिहिले आहे. यात अर्जदाराच्या छायाचित्राच्या जागी मांजरीचे छायाचित्र लावलेले आहे. वडील कॅटी बॉस व आई म्हणून कटिया देवीचे नाव लिहिले आहे. यात अर्जदाराचा मोबाईल क्रमांक लिहिलेला असून, त्याची सत्यासत्यता पटवण्यात येत आहे.
गावाचे नाव, ग्रामपंचायत, पिनकोड सर्व काही नमूद केलेले असून, अर्ज करण्याचे कारण स्टडी असे लिहिलेले आहे. विशेष म्हणजे अर्जाच्या खाली स्वतःचे शपथपत्रही जोडले आहे.